Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्माचे भागीदार

कर्माचे भागीदार
, शनिवार, 5 मार्च 2022 (15:34 IST)
एक ब्राह्मण भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला, 
''ॐ भवती भिक्षांदेहि" 
अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली,
"महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवा."
ब्राह्मण "हो" म्हणाला. ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले. ब्राम्हणाने ताक मागीतले. 
"भोजनांते तक्रं पिबेत". 
नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली,
थांबा महाराज, मी आत्ता शेजारणीकडून ताक घेवुन येते. तिने शेजारणीला ताक मागीतले. शेजारणीने भांडभर ताक दिले. आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले. ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला.
 
चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण? कारण, ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती. म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता. तिने ब्राम्हणाला मारले नव्हते. दारात आलेल्या अतिथीला पोटभर जेवण दिले होते. 

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता. कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता. कारण ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. 
 
यमधर्माने नागाला जाब विचारला. नाग म्हणाला "यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती. माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला."
 
यमाने घारीला जाब विचारला. घार म्हणाली "यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे."
 
प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता. मग आता कर्माचा भागीदार कोण ?
 
चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर. या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."
 
दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.
 
हा! हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.
 
एक बाई ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई, ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"
ताई म्हणाल्या, "नाही हो".
तेंव्हा एक बाई म्हणाल्या, "आहो, कसं सांगु s s s तुम्हाला. या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते. म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."
 
चित्रगुप्त यमाला म्हणाला, "पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा." 
आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांना या कर्माचे भागिदार बनवले.
 
थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे. जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत, कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका. हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chanakya Niti: तोंडावर गोड आणि पाठीमागील वाईट बोलणारे विनाशाचे कारण बनू शकते, अशा लोकांपासून सावध रहा