Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे एक सत्य

हे एक सत्य
, शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (16:13 IST)
लहानपणी आजी झोपताना कृष्णाची गोष्ट सांगायची. तुम्हालाही ही गोष्ट  माहीत असणार. गोष्टीमधे आई व छोटा मुलगा असे दोघेच राहायचे. अत्यंत गरीब परिस्थिती. घरात अगदी कसेतरी पोट भरेल एवढेच अन्न! हा मुलगा जंगलातून शाळेत जाताना खूप घाबरायचा.. "मी कसा शाळेत जाऊ" म्हणून आईजवळ रडायचा... त्या मुलाची आई नेहमी त्या मुलाला आपल्या पाठीशी 'कृष्ण' उभा आहे, आपल्याला काहीही कमी पडणार नाही, शाळेत जाताना सुद्धा हा तुझा 'दादा', 'कृष्ण' तुझ्या सोबत आहे, तो तिथेच राहतो, त्यामुळे घाबरायचे नाही. असा धीर देऊन शाळेत पाठवायची.
 
एके दिवशी शाळेत पूजा असते, तेंव्हा प्रत्येकाने काहीतरी प्रसादासाठी घरातून घेऊन यायचे असे ठरलेले असते. हा आईला प्रसादाकरिता काहीतरी मागतो, घरात देण्यासारखे काहीच नसते, तेंव्हा आई  रिकामाच गडू त्याच्या हातात देते आणि म्हणते.. "जा.., तुझ्या दादालाच माग जाता - जाता."
 
हा बिचारा रिकामा गडू घेऊन जंगलात दादाss दादाss अशी आरोळी देतो.. थोड्यावेळात तिथूनच एक गुराखी जात असतो. तो त्याला गडू भरून दूध देतो. शाळेत गेल्यानंतर त्याचे गडू भर दूध पाहून सर्वजण हसायला लागतात, परंतु ते पातेल्यात ओतल्यानंतर गडूतील दूध काही संपतच नाही... शेवटी मोठ मोठाली पातेले भरतात. सर्वांना आश्चर्य वाटते! "कोठून आणलेस हे दूध?" असे विचारल्यानंतर "माझ्या दादाने दिले" असे तो सांगतो. "तुझा दादा कोण! आंम्हालाही दाखव" असे  सर्वजण हट्ट करतात. तो सर्वांना घेऊन जंगलात येतो.. दादा.. दादा.. अशी आरोळी द्यायला लागतो. कोणाला ही तो दिसत नाही. पुन्हा सर्वजण त्याच्यावर हसतात... बिचारा खाली मान घालून उभा राहतो... तेवढ्यात... बासरीचे सूर ऐकू येतात... आणि गाई सोबत असणाऱ्या कृष्णाचे मनोहर रूप सर्वांना दिसते. सर्वजणं हात जोडून निस्तब्ध होतात.
 
आजी ही गोष्ट सांगायची तेंव्हा..ती आई, तिचा मुलगा, त्याच्याजवळची पुस्तकाची पिशवी, पायात चपटी स्लीपर आणि ते जंगल. सगळे डोळ्यासमोर चित्र उभे राहायचे.. त्याला न दिसणारा.. पण तो कुठेतरी आजूबाजूला उभे राहून त्या मुलाला निहाळणारा "कृष्ण" मात्र मला दिसायचा!
 
रोज हीच गोष्ट सांग.. म्हणून हट्ट असायचा. गोष्टीत रंगल्यामुळे त्या मुलाप्रमाणेच अनेक प्रसंगी माझ्याही सोबत तो दादा आहे, असे वाटायचे.
 
राखी पौर्णिमेला आई "कृष्णालाच" राखी बांधायला लावायची त्यामुळे तो अधिकच जवळचा वाटायला लागला.
 
लग्न झाल्यावर नवीन घरात नवीन माणसं, नवीन पद्धती बऱ्याच चुका व्हायच्या.. बऱ्याच वेळा चुकून कोणी काहीतरी बोलून जायचं. अशावेळी मात्र तो सोबत आहे असं वाटायचं आणि धीर मिळायचा. अशाप्रसंगी तो कुठे आहे? तो कसा असेल? असे वाटायचे. त्यातूनच त्याचा शोध घेणे सुरू झाले, पण जेंव्हा जेंव्हा धीर देणारी, स्फूर्ती देणारी, ओंजळीत आनंदाची फुले ओतणारी  माणसे भेटत गेली तेंव्हा तेंव्हा त्यांच्याकडे पाहिले की वाटायला लागले.. आपण शोधतोय तो हाच की..!
 
आजीने लहानपणी सांगितलेली गोष्ट, ही गोष्ट नाही तर ते प्रत्येकाच एक 'सत्य' आहे असे वाटायला लागले, आणि म्हणूनच 'सत्याला शोधल तरच सत्य सापडत' हे ही पटल. अवकाशातुन फिरणार्या अनेक लहरींचा शोध आपण घेत असतो. याच लहरींबरोबर कुठेतरी 'मनोहरा'च्या बासरीच्या सुरेल सुरांचा तो 'नाद' आणि ती 'लहर' आपल्या जवळून जात असेल, नाही का!! ईतर नादात तो 'नाद' मात्र आपण विसरतो. इतकेच खरे...! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवऱ्याची मैत्रीण ....