Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई

आई
, शुक्रवार, 10 मे 2019 (14:56 IST)
देवा घरचं अनमोल लेणं म्हणजे लेक. तिच्या येण्याने घराच स्वरूपच बदलत, कालांतराने घरची लाडकी लेक बहीण, मुलगी अशा नात्याने गुंफलेली लेक सून, बायको, वहिनी अशा विविध अलंकारांनी अलंकृत होऊन "आई" ह्या अनुपम नात्याने सुशोभित होते आणि सुरू होतो जीवनाचा एक सुखद प्रवास "माय लेकराचा". जीवनाची अवीट गोडी देणार नातं म्हणजे मातृत्व. एका अबोध बाळाची भाषा समजून त्याला प्रतिसाद देणारी आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावली देणारी फक्त आईच असते.
 
आपले कष्ट मुलांच्या हसण्यात सहज विसरणारी, शिक्षित असो वा अशिक्षित पालनपोषण करण्यात ती कधीच उणी पडत नाही. मुलांच्या सुखात सुख शोधणारी आपल्या अस्तित्वानं घराचं घरपण टिकवणारी आई बहुतेक प्रत्येक घरात गृहीत धरणारीच व्यक्ती असते. तिच्या भावना, इच्छा, अपेक्षा तिच्या बंद ओठात आणि पाणावलेल्या पापणीच असतात गरज असते फक्त त्या समजून घेण्याची.
 
जग बदलत आहे आचार विचार, जगण्याची पद्धत सर्वच काळानुरूप अतिशय गतिमान झाले आहे. नाती जपायला वेळ नाहीये, मान्य आहे, परंतु कालांतराने तुमच्या आईची गतिमान पाउले आता दमली आहेत त्या दमलेल्या पाउलांना सोबत अल्प सा काळ आपला वेग कमी करून आई या वडील दोघां साठी पण वेळ काढणे गरजेचे आहे. आता नाही तर कधीच नाही ही वेळ आली आहे.
 
आईला फक्त तुमचा वेळ हवा आहे, हाटेल, पार्टी या उपहार नको. तिला हवा आहे आपल्या मुलांचा सहवास, त्यांच्या बालपणीच्या आठवणी कारण तोच तिचा अनमोल ठेवा आहे आणि उर्वरित जीवनाचा आधार.
 
तर हा मातृदिन फक्त आपल्या आई साठीच राखीव ठेवून पुन्हा एकदा लहान होऊन तिच्या पदराची ऊब हाताचा स्पर्श, डोळ्यांतला स्नेहाचा आनंद पुन्हा नव्याने घेऊया. नक्कीच तुमचं मन आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण होईल. कृपया हे कधीच विसरू नका की ती आहे म्हणूनच आपण आहोत.
 
मातृशक्तीला शतशा नमन.
 
सौ. स्वाती दांडेकर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तपदी