Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 9 March 2025
webdunia

स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी

mother
‘आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी.
 
चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना। या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे। मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा। व्याकूळ मात्र होई!
वात्सल्य माउलीचे। आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का?। आम्हास नाही आई
 
शाळेतुनी घराला। येता धरील पोटी
काढून ठेवलेला। घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या। धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे। का ह्या करील गोष्टी ?
तुझ्याविना न कोणी। लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया। आम्हा ‘शुभं करोति’
 
ताईस या कशाची। जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला। समजे न यात काही
पाणी तरारताना। ‘आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी। ‘आम्हास नाहि आई’
 
आई! तुझ्याच ठायी। सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे। अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे। औदार्य या धरेचे
नैत्रात तेज नाचे। त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी। त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे। आई तुझ्यात साचे
 
गुंफूनि पूर्वजांच्या। मी गाईले गुणाला
सार्‍या सभाजनांनी। या वानिले कृतीला
आई ! करावया तू। नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही। मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची। ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा। तव कौतुका भुकेला
 
येशील तू घराला। परतून केधवा गे !
दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे
कर्तवय् माउलीचे। करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे
ये रागवावयाही। परि येइ येइ वेगे
 
कवी - यशवंत दिनकर पेंढारकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Negative People Signs या 4 चिन्हांनी आजूबाजूच्या नकारात्मक लोकांना ओळखू शकता