Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना – मुख्यमंत्री

कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना – मुख्यमंत्री
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:17 IST)
कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते.
 
केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका.  नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात राजकीय,सामाजिक,धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक  आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेत,अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे.आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे.त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.

आज लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून ते म्हणाले की, तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा  सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असेही ते म्हणाले.

आज लोकार्पण करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

असे आहे लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र…
कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फुटांचे असून रुग्ण खाटांची संख्या 30 आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षिततेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘माझी जीवनगाथा’, असं म्हणत राज ठाकरे यांचे सूचक ट्वीट,