मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत पालिका रुग्णालयात पुणे सिरम इन्स्टिट्यूटची लस देण्यात येत होती. मात्र, आता भारत बायोटेक कंपनीची लसही या शनिवारपासून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात उपलब्ध होणार असून या लसीचे डोस सोमवारपासून नागरिकांना देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सध्या पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सिरम इन्स्टिट्युटची लस दिली जात आहे. मात्र, आता शनिवारी पालिकेला भारत बायोटेक कंपनीची लस उपलब्ध होणार आहे. या लसीची सुमारे दीड लाख इतकी मात्रा पालिकेकडे येणार आहे. सोमवारपासून पालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर या रुग्णालयांमध्ये भारत बायोटेकची लस देण्यात येणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून सध्या लसीकरण मोहिमेअंतर्गत पालिकेच्या २४ लसीकरण केंद्रासह राज्य सरकारच्या ४ आणि खासगी ३८ अशा ६६ ठिकाणी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत लसीकरण सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पार पडले असून सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे.
लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी लसीकरण वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या १०० पर्यंत वाढवण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. सध्या पालिकेकडे कोरोना लसीचे १० लाखांवर डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी लसीकरणासाठी जास्त गर्दी करू नये. सर्वांना लस दिली जाणार आहे. पालिकेने या लसीकरणाचे योग्य नियोजन केले आहे, असेही काकाणी म्हणाले.