Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण
, सोमवार, 15 मार्च 2021 (07:54 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गीचालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.
 
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेत पाहणी केली. मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळांवर देखील अशी सुविधा सुरु होणे गरजेचे असल्याचे पर्यावरणमंत्री ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल.
 
उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण 40 व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात 12 दक्षिण मुंबईत सुरु करण्यात येणार आहेत. या 12 बग्गींपैकी 6 बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या 6 बग्गी नरिमन पॉइंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे 250 बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर 70 ते 80 किमीपर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार तर मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांवरही लवकरच सेवा सुरु केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही करार केला जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस नेते नाना पटोले उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात : आठवले