करोनामुळे निधन झालेल्या पतीची अखेरची इच्छा म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला १ कोटी रुपयांचे दान दिले आहे. मुंबईतील एका सामान्य कुटुंबातील भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल एक कोटी रुपयाचे दान मंदिर समितीला दिले आहे. मंदिराच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.
आतापर्यंतचे इतिहासामध्ये मंदिर समितीला एका भाविकाकडून एवढ्या मोठ्या रकमेचे दान आजपर्यंत प्राप्त झालेले नाही. मुंबई येथील एक तरुण विठ्ठलभक्त करोना संसर्गाची लागण होऊन दोन महिन्यांपूर्वी जगाला निरोप देऊन गेला. विठ्ठलावर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच त्याने आपल्या पत्नी आणि आईलाला निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठुरायाला अर्पण करण्याची शेवटची व्यक्त केली. दुर्दैवाने काही दिवसांतच विठ्ठल भक्ताचे निधन झाले आणि पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी या विधवा पत्नीने विमा कंपनीकडून आलेले १ कोटीची रक्कम मंदिराला देण्याचा निर्णय घेतला.
पंढरपूर शहरात ही महिला आपली मुलगी आणि सासूला घेऊन विठ्ठल मंदिरात पोहचली आणि पतीच्या इच्छेप्रमाणे विठुरायाच्या चरणी गुप्तदान दिले. मात्र आपली ओळख उघडकीस करुन नये अशी विनंतीही केली. त्यांनी नाव आणि देणगी रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. मंदिराकडून गेल्या आठ दिवसांत याबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नव्हती मात्र एका कर्मचाऱ्याकडून ही माहिती लीक झाली आणि प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली.
यानंतर मंदिर प्रशासनाने या 1 कोटीच्या देणगीबाबत दुजोरा दिला असून या महिलेने 10 लाखाचे 10 चेक मंदिर प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत. आश्चर्य म्हणजे ही रक्कम कुटुंबाच्या भविष्यासाठी कामी येऊ शकली असते पण या विठ्ठल भक्ताला मृत्यूच्या वेळीही देवावरची श्रद्धा मोठी ठरली. त्याहून विधवा पत्नीनेही पतीच्या मृत्यूनंतर आपले आणि आपल्या लहानग्या मुलीच्या भविष्यापेक्षा त्याचा अखेरचा शब्द पाळणे महत्वाचे वाटले, याचं विशेष कौतुक होत आहे.