गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्या मुळे लांबच्या पल्ल्यांच्या अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे. काही गाड्यांचे प्रवासाचे मार्ग कमी करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. विस्कळीत झाल्यानंतर कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मर्यादित वेगाने वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वासिंद-खर्डी सेक्शनवर पहाटे 3 ते पहाटे 6 दरम्यान मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रेल्वे ट्रॅकच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे. यामध्ये 'ओव्हरहेड इक्विपमेंट' (OHE) पोल वाकल्याने एक झाड उन्मळून पडल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेनेही अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. मध्य रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांची माहिती दिली आहे. यामध्ये 12110 (MMR-CSMT), 11010 (पुणे-CSMT), 12124 (पुणे CSMT डेक्कन क्वीन), 11007 (CSMT-पुणे डेक्कन), 12127 (CSMT-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस) यांचा समावेश आहे.
माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्यामध्ये 16345 LTT-थिरुवनंतपुरम एक्सप्रेस, 12289 CSMT-नागपूर दुरंतो एक्सप्रेस आणि 12145 LTT-पुरी SF एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
अनेक गाड्या कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मडगाव मार्गे वळवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. या विभागात अडकलेल्या अनेक गाड्यांमधील प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची, बिस्किटांची आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय प्रवाशांच्या माहितीसाठी स्थानकांवर सातत्याने घोषणा दिल्या जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.