Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 8 March 2025
webdunia

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

Brain Eating Amoeba
, शनिवार, 6 जुलै 2024 (21:02 IST)
शुक्रवारी (5 जुलै) गुगलवर तब्बल 20 हजारांवर युजर्सनी गुगलवर ‘केरळ ब्रेन इटिंग अमिबा’ (kerala brain eating amoeba)याबद्दल माहिती घेतली. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांत केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या या अमिबामुळं तिघांचा मृत्यू झाला आहे.
 
मृत्यू झालेल्या तिघांनाही या अमिबामुळं संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. पण उपचार होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यावरुन हा अमिबा किती धोकादायक आहे हे लक्षात येतं.
कोळिकोड येथील 14 वर्षीय मृदूल, कुन्नूर येथील 13 वर्षीय दक्षिणा आणि मल्लापुरम येथील 5 वर्षीय फतवा यांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला.
 
यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) यांच्या मते, ज्या लोकांना हा संसर्ग होतो त्यापैकी 97% लोकांच्या मेंदूच्या उती (टिशू) नष्ट होतात, त्यामुळं मेंदूवर सूज येते आणि मृत्यू होतो.
 
नेमके प्रकरण काय?
मृदूल हा सातव्या वर्गात शिकत होता. एक दिवस तलावात पोहून आल्यानंतर त्याला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.
 
आधी त्याला कोळिकोडमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
तिथे केलेल्या तपासणीनंतर, त्याची तब्येत मेंदू खाणाऱ्या अमिबामुळं बिघडल्याचं निदान झालं. त्याला प्रायमरी अमिबिक मेनिंजिओसिफॅलिटिस असं म्हणतात.
 
त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण 24 जून पासून त्याची तब्येत खालावत गेली अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
डॉक्टर अब्दुल रौब कोळिकोड येथील एका खासगी रुग्णालयात पेडियाट्रिक ऑंकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी या मुलावर उपचार केले.
 
“प्राथमिक आरोग्य केंद्रातून या मुलाला पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तो आला तेव्हाच बेशुद्ध होता. आम्ही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि मेंदू खाणाऱ्या अमिबासाठीची चाचणी केली. आम्ही त्याला अँटिबायोटिक्स आणि अँटिफंगल्स दिले. मात्र त्याला वाचवू शकलो नाही,” असं डॉ. अब्दुल रॉब म्हणाले.
 
याच अमिबामुळे कुन्नूर येथील 13 वर्षीय दक्षिणाचा मृत्यू झाला होता. ती मुन्नारला शाळेच्या सहलीला गेली तेव्हा त्याठिकाणी एका स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेली होती, असं द हिंदू या वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटलं आहे.
 
त्याआधी 5 वर्षीय फतवा या मल्लापूरममधील मुलीचा याच अमिबामुळं मृत्यू झाला होता. 1 मे रोजी ती तिच्या घराजवळ असलेल्या काडालुंडी नदीत नातेवाईकांबरोबर अंघोळीला गेली होती.
 
नंतर 10 मे रोजी ती वारंवार बेशुद्ध पडू लागली आणि उलट्या करत होती. एक आठवडा तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
 
मेंदू खाणारा अमिबा काय असतो?
प्रायमरी अमिबिक मेनिंजिओसिफॅलिटिस हा संसर्ग नेग्लेरिया फॅलेरी या मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होतो.
 
सीडीसी ने दिलेल्या माहितीनुसार हा अमिबा कोमट पाण्यात, नदी आणि तलावात आढळतो.
 
हा अमिबा कायम नदी, तलाव आणि अस्वच्छ स्विमिंग पूलमध्ये आढळतो. या ठिकाणी अंघोळ केली तर नाकावाटे तो शरीरात जाण्याची शक्यता असते.
“हा अमिबा नाकावाटे मेंदूत जातो. मेंदूतल्या उती नष्ट करतो आणि त्यामुळं जळजळ व्हायला सुरुवात होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप येतो आणि त्याचा मृत्यू होतो.” असं अब्दुल रौब म्हणाले.
 
काही दुर्मिळ प्रकरणांत वॉटर पार्कच्या स्विमिंग पूलमधील पाण्याचं नीट क्लोरिनेशन केलं नसेल, तर तिथंही हा अमिबा आढळतो अशी माहिती सीडीसीने दिली आहे.
 
सीडीसीच्या मते, अमेरिकेत दरवर्षी 10 पेक्षा कमी लोकांना हा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्यांपैकी बहुतांश जणांचा मृत्यू होतो.
 
या अमिबाचा संसर्ग झाल्यास डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या होतात.
 
या अमिबाची वाढ लवकर होते त्यामुळं संसर्ग झाल्यावर 18 दिवसांत रुग्णाचा मृत्यू होतो. संसर्ग झाल्याच्या 5 दिवसानंतर रुग्ण कोमामध्ये जातो आणि त्याचा मृत्यू होतो, असं सीडीसीचं म्हणणं आहे.
 
ही आहेत लक्षणे
हा अमिबा शरीरात वाढतो तेव्हा मानेत ताठरपणा येतो, आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत होत नाही, तोल जातो आणि चक्कर येते अशी माहितीही या संस्थेनं दिली.
 
हा संसर्ग दुर्मिळ असल्यामुळं चाचण्या केल्यानंतरही त्याचं निदान होणं कठीण असतं. अनेकदा रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचं निदान होतं.
 
विशिष्ट ठिकाणी का पसरतो संसर्ग?
नदी, तलाव आणि स्विमिंग पूलमधल्या पाण्याचं तापमान उन्हाळ्यात दीर्घकाळ वाढलेलं असतं तेव्हा हा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.
सीडीसीच्या मते, पाण्याचं उच्च तापमान आमि स्विमिंग पूलमधील कमी पाणी यामुळं मुख्यत: हा संसर्ग होतो.
“हा अमिबा नदी, तलाव, स्विमिंग पूल अशाठिकाणी नाकावाटे शरीरात जातो,” असं अब्दुल रौब सांगतात.
पिण्याच्या पाण्यात जो अमिबा असतो त्यामुळे संसर्ग होत नाही. तसंच हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही, असंही सीडीसीचं म्हणणं आहे.
 
संसर्गापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे?
अनेक लोकांना अंघोळीसाठी स्विमिंग पूल किंवा नदीवर जायचं असतं. अशा परिस्थितीत काय करायचं? याविषयी डॉ. अब्दुल म्हणाले की -
 
ज्या स्विमिंग पूलची नीट निगा राखली नसेल अशा आणि कमी पाणी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये जाऊ नये.
स्विमिंग पूलचं क्लोरिनने निर्जंतुकीकरण केलं आहे की नाही हे नीट तपासावे.
प्रदूषित नदीत पोहणं टाळावं.
शक्य असेल तेव्हा पूलचं क्लोरिनेशन करावं.
हा अमिबा नाकातून जातो त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना किंवा डाईव्ह करताना डोकं वर ठेवावं.
 
केरळ सरकारचे म्हणणे काय?
केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या विषयावर चर्चा केली. त्यांनी काही सूचनाही केल्या.
 
जे स्विमिंग पूल योग्य पद्धतीने क्लोरिनेट केलेले नाहीत तिथे आणि अशुद्ध पाण्यात पोहायला न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
लहान मुलांना या संसर्गाचा धोका जास्त असतो त्यामुळे पोहताना स्विमिंग नोझ क्लिपचा वापर करावा आणि संसर्ग टाळावा, असं ते म्हणाले.
पाणी शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.

Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात