Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ

eknath shinde
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (22:03 IST)
मुंबई: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्रीदेखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाहीत. काल, शुक्रवारी ७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ वाजेपर्यंत मुख्यमंत्री श्री.शिंदे सामान्यांना भेट होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस झाले त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
 
मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामन्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातले मुख्यमंत्री अशी भावना यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या ही विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जास्त आढळून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक येत आहेत.  त्यांची निवेदने स्वीकारून म्हणणे ऐकून घेतले जाते.
 
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले..त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या  समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विले पार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणेआठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.
 
नियोजित कार्यक्रम असला, तरी सामान्यांना न भेटताच कसं जायचं म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचं ठरवलं. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. एवढ्या उशीराही मुख्यमंत्री भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

Edited By - Ratandeep Ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर