Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयात हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा

घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयात हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा
, रविवार, 2 मे 2021 (08:19 IST)
सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये अशा विविध महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
 
मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला.  
 
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे  यंदादेखील कोविडचा मुकाबला करताना इतर रोगांच्या रुग्णांनासुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लेप्टो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करताना या नॉन कोविड रुग्णांसाठीसुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी.
 
पहिल्या लाटेमध्ये विशेषत: ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळला तर या दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात प्रमाण जास्त दिसते एवढेच नाही तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसतोय. येणाऱ्या संभाव्य लाटेत हे प्रमाण आणखी वाढले तर आपली पूर्ण व्यवस्था हवी त्याचे नियोजन करून ठेवा व रुग्णालयांतील लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
सध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटिलेटर्स  पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
यावेळी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिकेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, रुग्णांचे चाचणी अहवाल लगेच देणे, मुंबईतील वॉर्ड वॉर रूम्समार्फत नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढविणे, लसीकरण केंद्रांची संख्या विविध माध्यमांतून वाढविणे याकरिता तात्काळ काही पावले उचलण्यात आली आहेत, त्याविषयी माहिती दिली. बीकेसी येथील जम्बो केंद्राचे डॉ. राजेश डेरे  यांनीदेखील केंद्रातील रुग्णाच्या नातेवाईकांना मोबाईल एपद्वारे उपचारांविषयी सर्व अद्ययावत माहिती कशी दिली जाते त्याची माहिती दिली. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी कसा नियमित संपर्क ठेवण्यात येतो ते सांगितले.
 
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी निझामपूर, पनवेल, नवी मुंबई , वसई विरार पालिका आयुक्तांनी त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनीदेखील आपापल्या भागातील रुग्ण संख्या स्थिरावत आहे तरी रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली.
 
यावेळी टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सौम्य व लक्षणविरहित रुग्णांची प्रकृती अचानक ढासळत जाणे, रुग्णालयात उशिरा दाखल करणे यामुळे मृत्यू दर वाढल्याचे सांगून रेमडेसिवीर , स्टिरॉइड्सचा वापर, प्लाझ्माची नेमकी उपयुक्तता, विशेषत: रात्रीच्या वेळी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live Commentary: 5 राज्यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाशी संबंधित क्षणाक्षणाची माहिती ...