महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील करोनाचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागल्याचे शुभवर्तमान आहे. संपूर्ण मुंबईत रुग्णवाढीचा वेग १.३९ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका झाला आहे. वांद्रे परिसरात हा कालावधी तब्बल १४० दिवसांवर पोहोचला असून, डोंगरी, कुर्ला, माटुंगा या भागात ७९ ते ९८ दिवसांपर्यंत वाढला आहे.
मे आणि जून या दोन महिन्यांत मुंबईत करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आलेख खाली येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये १४ ते २० जून या कालावधीमध्ये ८४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. २१ जून ते २७ जून या आठवड्यात ८९२३, २८ जून ते ४ जुलैमध्ये ८९८५ तर ५ ते ११ जुलै या कालावधीमध्ये ८५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजे सुमारे ५०० रुग्ण कमी झाले आहेत. तर दुसरीकडे २२ मार्च, २०२० रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ तीन दिवस होता. १५ एप्रिलला ५ दिवस, १२ मे रोजी १० दिवस, २ जूनला २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस, २४ जून रोजी ४१ दिवस नोंदविण्यात आला होता. तर रविवारी १२ जुलै रोजी हा कालावधी तब्बल ५० दिवसांवर पोहोचला आहे.
रुग्णसंख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. २४ जून रोजी हा दर सरासरी १.७२ टक्के एवढा होता. तो १२ जुलैला सरासरी १.३९ टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीनुसार सर्वांत कमी दर हा वांद्रे एच पूर्व विभागात ०.५ टक्के, डोंगरी बी विभागामध्ये ०.७ टक्के, कुर्ला एल विभागात ०.८ टक्के आणि माटुंगा एफ उत्तर विभागात ०.९ टक्के नोदविण्यात आला आहे. उर्वरित २० विभागांपैकी ११ विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा १.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
टास्क फोर्स समितीमधील डॉ. शशांक जोशी यांच्याकडे मुंबईतील करोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली असता त्यांनी हे प्रमाण स्थिरावत असल्याचे सांगितले. 'हे प्रमाण अद्याप उतरणीला लागलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांनी गाफील राहू नये', याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मृत्यूदराचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले, 'तपासण्यांची संख्या वाढली की नव्या रुग्णांची नोंद होणे अपेक्षित आहे. मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्याचे ध्येय गाठणे महत्त्वाचे असून, मागील आठवड्याच्या तुलनेत दर कमी झाला आहे.' प्रत्येक आठवड्याला जितके रुग्ण सापडतात तितके रुग्ण बरेही होत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी रुग्ण संख्या आटोक्यात येणे हा 'मुंबई पॅटर्न' असल्याचे म्हटले आहे. हा पॅटर्न आता देशभरात नावाजला जात असून, यामागे पालिकेने राबवलेले 'चेस द व्हायरस' हे धोरण परिणामकारक ठरल्याचे त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. हे यश विविध आघाड्यांवर लढणाऱ्या प्रत्येक पालिका कर्मचाऱ्याचे असल्याचे म्हैसकर म्हणाल्या. म्हैसकर यांनी करोनाची लस येईपर्यंत मुंबईकरांनी 'न्यू नॉर्मल' जीवनशैली आत्मसात करताना, प्राप्त परिस्थितीसोबत जगण्यास सुरुवात करावी, असे आवाहन केले आहे. न्यू नॉर्मल म्हणजे काय तर, कुठल्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडून करोनाला निमंत्रण देणे खरंच गरजेचे आहे काय, हे स्वतःला विचारणे. हा संसर्ग टाळण्यासाठी बुफे जेवण करणे, जिममध्ये जाणे, मनोरंजन उद्यानात जाणे, चित्रपटगृह किंवा बारमध्ये जाणे, संगीत मैफल किंवा क्रीडांगणात जाणे, गर्दी असलेले धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावणे अशा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी या काळात न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी गर्दीची ठिकाणे आणि जवळून संपर्क येईल अशी ठिकाणे, बंदिस्त जागा टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
मृत्यूदरात मात्र वाढ
मुंबई शहरात १४ ते २० जून या कालावधीमध्ये १४४८ मृत्यूंची नोंद झाली होती. करोना संकटातील हा सर्वाधिक मृत्यूंचा आकडा आहे. मागील आठवड्यात मृत्यूंची संख्या कमी झाली होती. ती ४१४ इतकी होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मृत्युदराची टक्केवारी ५.८० टक्के होती. तर मागील आठवड्यात हे प्रमाण ५.७२ टक्के नोंदवण्यात आले आहे. मुंबईत आत्तापर्यंत ५२८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयातून ४८ ते ७२ तासांतील मृत्यूंची आकडेवारी एकत्रित येत असल्याने बळींची संख्या अधिक दिसत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
रुग्णवाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते. पालिकेने शोध, तपासणी, चाचण्या आणि उपचार या चतु:सुत्रीचा मुंबईत केलेला वापर प्रभावी ठरत असून रूग्ण संख्या घटत आहे. तसेच रूग्ण दुपटीचा कालावधी देखील कमी झाला आहे. - इक्बालसिंह चहल - आयुक्त, मुंबई महापालिका