मुंबई दि. ९ मार्च - स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलिस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचे 'थोबाड काळे झाले' अशाप्रकारची भाषा कसे वापरू शकतात? असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचे नव्हे तर पोलिसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढत आहेत हेच समजत नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.
देवेंद्र फडणवीस एवढा राग का काढत आहेत याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. परंतु, त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत असा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाला उज्वल परंपरा आहे म्हणून सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत करू नका असे आवाहनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.