देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दिवाळीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये येणार आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
नागपूर ते शिर्डी या महामार्गाच उद्घाटन गेल्या १ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. परंतु काही कारणास्तव हा मुहूर्त लांबणीवर पडल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शुभारंभ लांबणीवर पडला आता हा शुभारंभ होणार आहे.
नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचंच उद्घाटन दिवाळीत होणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर-मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.