मुंबई – मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचा/मालमत्तेचा व्यवसाय करणारे प्रत्येक घरमालक, जागा मालक, व्यक्ती ज्यांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे, सवलत दिली आहे त्या भाडेकरूचा सर्व तपशील त्वरित www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन कळवावा, असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जर अशी व्यक्ती परदेशी असेल, तर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्यांचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील म्हणजे पासपोर्ट क्रमांक, ठिकाण, आणि जारी करण्याची तारीख, वैधता सादर करावी. व्हिसा तपशील म्हणजे व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे.
हा आदेश दि. 06 नोव्हेंबर 2022 पासून अंमलात येईल आणि पूर्वी मागे घेतल्याशिवाय दि 04 जानेवारी, 2023 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) 60 दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अंतर्गत दंडनीय असेल. सर्व संबधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जावू शकत नसल्यामुळे याद्वारे हा आदेश एकतर्फी पारित करण्यात आला आहे, असेही पोलीस उप आयुक्त, (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor