राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली. नुकतेच केदार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील क्रीडा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत चर्चा केली होती.
याबाबत माहिती देतांना श्री.केदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यानुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर मान्य करण्यात येणार आहे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १००० खेलो इंडिया सेंटर उघडण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या योजनेत महाराष्ट्रामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने, राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा खेलो इंडिया सेंटर उभारणीचा उद्देश आहे, असे श्री.केदार यांनी सांगितले. त्याद्वारे लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, मला खात्री आहे की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. राज्यात जास्तीत खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर्स सुरु करुन खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.