आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, तर काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मेगाब्लॉकमुळे आज लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावेल.
मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने अप धिम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान सर्व धिम्या लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान पनवेल ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल या दोन्ही मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तसेच पनवेल ते अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते पनवेल या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येतील. तसेच सीएसएमटी ते वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे ते नेरुळ या मार्गावरून विशेष गाड्या सोडण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते माहीम या अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गवरील लोकल अप-डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.