मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात उपाचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडामार्फत १०० फ्लॅट्स टाटा कॅन्सर रुग्णालयाला देऊ केले आहेत. यामुळे रस्त्यावर किंवा इतरस्त्र राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय आता टळणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाचे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजीकासम चाळ परिसरातील म्हाडाचे 100 फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देत असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं.
\दरम्यान, आव्हाड यांनी ही संकल्पना काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. फ्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचं यावेळी आव्हाड म्हणाले. म्हाडाने फ्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाचे असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केलाय.