Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन!

नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन!
नवी मुंबई , शुक्रवार, 12 जून 2020 (10:49 IST)
कोरानाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात खंड पडू नये, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या शाळांमधील अभ्यासक्रम 15 जून पासून ऑनलाईन सुरू करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
 
विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती व चिंता दूर करीत इयत्ता 1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिकविण्याकरिता ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता विविध संकेतस्थळे, पोर्टल यांच्या सहाय्याने निरनिराळ्या विषयांचे अध्यापन करणारे शिक्षक इयत्तानिहाय व विषयनिहाय घटकांचे सूक्ष्म नियोजन करुन ई-लर्निंग साहित्य तयार करीत आहेत. यामध्ये ऑडीओ, व्हिडिओ, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे विविध प्रकारचे पूरक साहित्य तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे व मूल्यमापन करण्याकरिता स्वाध्याय, गृहपाठ, चाचणी यासारखे साहित्यही तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या अनुषंगाने स्वतंत्र यू-टयुब चॅनेल तयार करण्यात आला असून यावर शिक्षकांनी तयार केलेले आदर्श नमुना पाठ इयत्ता व विषयनिहाय प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
 
हे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पहावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडी-अडचणी व मूल्यांकन याबाबत नियमित संवाद व्हावा याकरिता शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यांचे व्हॉटस् ऍप ग्रूप तयार करण्यात आलेले आहेत. व्हिडिओव्दारे प्रसारित अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय प्रत्येक विद्यार्थ्यांने सोडविणे आणि तो तपासण्याकरिता संबंधित वर्गशिक्षकास व्हॉट्स ऍप ग्रूपवर पाठविणे अशी कार्यप्रणाली असेल. यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासावर आपोआप पालकांचेही लक्ष राहणार आहे. अशा पध्दतीने यू टय़ुब व व्हॉट्स ऍप यासारख्या सध्याच्या काळातील अत्यंत प्रभावी व लोकप्रिय सोशल मीडियाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे दरवाजे खुले करून दिले जात आहेत.
 
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांच्या वितरणाचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले असून प्रत्येक शाळेमध्ये पालकांना आपल्या पाल्याची पाठय़पुस्तके वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. याशिवाय शासनाने इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतची पुस्तके http://cart.ebalbharti.in/BalBooks/ebooks.aspx  या लिंकवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रमही ठरवून दिलेल्या वेळेनुसार दूरदर्शनवर प्रसारित केला जाणार आहे.
 
सीबीएसई अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एप्रिलपासून सुरू होत असल्याने, 1 एप्रिलपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसईच्या दोन्ही शाळांमधील अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यात आले असून 15 जूनपासून सर्वच शाळांतील अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविले जाणार आहेत.
 
नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग दक्ष असून आधुनिक ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा प्रभावी वापर केला जाणार आहे.
 
असे असेल ऑनलाईन शिक्षण
 
ऑनलाईन पध्दतीने शिकविण्याकरिता ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता विविध संकेतस्थळे, पोर्टल यांच्या सहाय्याने निरनिराळ्या विषयांचे अध्यापन करणारे शिक्षक इयत्तानिहाय व विषयनिहाय घटकांचे सूक्ष्म नियोजन करुन ई-लर्निंग साहित्य तयार करीत आहेत. यामध्ये ऑडीओ, व्हिडिओ, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे विविध प्रकारचे पूरक साहित्य तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या अनुषंगाने स्वतंत्र यू-टयुब चॅनल तयार करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांच पालक व शिक्षक यांचे व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाऊनमुळे भारताच्या महत्वाकांक्षी “मिशन गगनयान“चे उड्डाण रखडणार