Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (17:47 IST)
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर नवाब मलिक ईडी कार्यालयाच्या बाहेर आले. हसत हसत त्यांनी प्रसारमाध्यमांना हात दर्शवला.
 
वैद्यकीय तपासणीसाठी मलिक यांना जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झालं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
 
दरम्यान, नवाब मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी तिथे जोरदार घोषणाबाजीही केली.
 
अटक झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही- शंभुराजे देसाई
"राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला पहाटे घरातून नेणं योग्य नाही. त्यासाठी ईडीने नोटीस द्यायला हवी होती. नंतर नोटीस देऊन बोलवायला हवं होतं. असं सकाळी एकाएकी घेऊन जाणं योग्य नाही. ईडी अधिकृतपणे अटक झाल्याचं सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांना अटक झाली असं म्हणणं योग्य होणार नाही", असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे.
 
मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस म्हणण्याची सवय- शरद पवार
नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
 
शरद पवार यांनी म्हटलं, "त्यांनी कोणती केस काढली आहे? नवाब मलिक यांच्या वरती कोणत्या प्रकरणात कारवाई केली गेली आहे याबाबत मला माहिती नाही. काही झालं विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असेल तर दाऊदचा माणूस आहे म्हणायची सवय आहे. त्याच्यात काही नवीन नाही."
"मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावरही असेच आरोप झाले होते. आता वीस-पंचवीस वर्षं झाली तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, सत्तेचा गैरवापर करणं सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे. ते केंद्र सरकारवर बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केलं गेलं आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
 
ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणल्यामुळे कारवाईची शक्यता- रोहित पवार
नवाब मलिकांनी महाराष्ट्रातलं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं. त्यात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं समोर आली. गुजरातमध्ये 22 हजार कोटीपेक्षा अधिक ड्रग्ज सापडलं. इथं उघडकीस आलेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटल्यामुळे कारवाई झाली असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली.
आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.
 
यूपीमध्ये ईडीचे सिंग नावाचे अधिकारी होते, त्यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे सत्तेत असताना, पदावर असताना आम्ही सांगू ते करा, निवृत्तीनंतर आम्ही पुनर्वसन करु असा संदेश भाजप देत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला.
 
हा सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार- जयंत पाटील
नवाब मलिकांच्या बाबतीत हा सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे, असं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे काम केले जात असल्याचाही आरोपही जयंत पाटील यांनी केला.
 
लोकशाही मूल्यांची पायमल्ली, मलिकांच्या पाठीशी- दिलीप वळसे पाटील
"केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत", असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
 
संविधानविरोधी कृत्य- जितेंद्र आव्हाड
"केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे निंदनीय आहे. यातून संविधान व लोकशाही विरोधी काम होते", असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
 
20 वर्षांनी नवाब मलिकांची चौकशी का?- संजय राऊत
"नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
"महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. पण ही चौकशी हे 20 वर्षांनी कशी करत आहेत," असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
 
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
नथुराम गोडसेची विचारधारा अंगीकारून सूडाचं राजकारण- हुसेन दलवाई
"सूडाचं राजकारण आहे. सातत्याने केलं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हेच शिकवलं आहे. नथुराम गोडसेची विचारधारा अंगीकारून ते राजकारण करतात. हा नवाब मलिकांपुरता प्रश्न नाही, सगळ्या देशाचा प्रश्न आहे. सरकारी संस्थांचा वापर ही अतिशय गंभीर बाब आहे. अटक करणं चुकीचं आहे", असं हुसेन दलवाई म्हणाले.
 
नवाब मलिकांना झालेली अटक हा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असं मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लुडो खेळावरून लोकल मध्ये हाणामारी