मुंबई पालिकेच्या 76 कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगने मान्य केली. या चौकशीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. कॅगच्या चौकशीतून सर्व सत्य समोर येईल. कुठलीही चौकशी सूडबुद्धीने होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
बिर्ला हाऊसमध्ये भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147वी जयंती साजरी करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या 147वी जयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या कॅगच्या चौकशीबाबत भाष्य केले. “कुठलीही चौकशी सुडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही. त्यामध्ये पारदर्शकता असेल, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जो अहवाल येईल, त्यानंतर बोलू”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
Edited by: Ratnadeep Ranshoor