Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा

बाप्परे, उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा
, बुधवार, 23 जून 2021 (08:08 IST)
मुंबईतल्या घाटकोपर (पूर्व) येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात मेंदूज्वर व लिव्हर या आजाराने त्रस्त श्रीनिवास यल्लपा (२४) हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना उंदराने त्याच्या डाव्या डोळ्याचा काही भाग कुरतडला.  या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
 
महापौरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली व पाहणी केली. सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये , यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात श्रीनिवास यल्लपा (२४) या तरुणाला मेंदूज्वर व लिव्हरचा त्रास असल्याने व त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आले. त्याला आयसीयू विभागात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो बेधुद्ध अवस्थेत होता. मात्र त्याच्या डाव्या डोळयाचा काही भाग उंदराने कुरतडल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
 
त्याच्या डोळ्याच्या खालील भागातून रक्त निघत असल्याचे पाहून त्याचे नातेवाईक हादरले. त्यांनी तात्काळ नर्स, डॉक्टर यांना पाचारण केले. त्याच्या डोळ्यांची नीटपणे तपासणी केली असता त्याच्या डाव्या डोळ्याचा भाग उंदराने कुरतडला असल्याचे निदर्शनास आले. तसेच, याप्रकरणी राजावाडी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी, या रुग्णालयात काही ठिकाणी उंदरांचा वावर असल्याचे मान्य करीत उंदरानेच डोळा कुरतडल्याचा निष्कर्ष काढला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित