डॉ. तात्याराव लहाने ज्यांच्या कार्यामुळे ते आज राज्यातील गाव-खेड्यातील लोकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा हाती घेतलेला वसा आहे. तसेच विनामुल्य गोरगरिबांची मदत करण्यासाठी देखील त्यांना ओळखले जाते. पण आज (ता. 31 मे) त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासहित आणखी 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जे. जे. रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभाग हा बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे.
या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी एकाचवेळी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. तर हे राजीनामे देताना डॉ. लहाने आणि अन्य राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांनी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचे सविस्तर प्रसिद्ध पत्रक या डॉक्टरांकडून जारी करण्यात आले आहे. त्यांनी या पत्रकातून आपली भूमिका मांडली आहे.
काय लिहिले आहे या पत्रात?
गेल्या काही दिवसांपासून आपण निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहीलेच असेल. नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देनिहाय उत्तर दिलेलं आहे. 1995 पूर्वी रोज फक्त 30 रुग्ण येणाऱ्या या विभागात आज 300 ते 400 रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने 2008 मध्ये विभागास विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा दर्जा दिला. या विभागात महाराष्ट्रभरातून आणि इतर राज्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.
डोळ्यांमधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात उपचारासाठी येतात. या विभागात वेगेवेगळ्या अतिविशोपचार सेवा दिल्या जातात. (उदा – मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल आणि सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ज्ञांमार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी आणि ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ज्ञ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. मागील 28 वर्षात 692 शिबीरे घेऊन 30 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.
2016 मध्येही निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील 12 पैकी 11 डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेसही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला.
आता पुन्हा 22 मे 2023 ला सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डॉक्टरांनी अधिष्ठांकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीचे स्पष्टीकरण डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे मागितले. पण अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत 31 मे ला सेवानिवृत्त होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
या वरुन हे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुद्धीने त्रास देण्यासाठी आणि त्यांची बदनामी केली आहे हे सिद्ध होत आहे. या विभागामार्फत डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी इतर कोणाताही अध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पण तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.
सहा महिन्यापूर्वी विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजी झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.
अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार अध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील अध्यापक अपामन सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चूक नसताना विभागातील अध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.
दरम्यान, या पत्रावर डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रितम सामंत, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरंजीत सींग भट्टी, डॉ. दीपक भट, डॉ. अश्विन बाफना, डॉ. सायली लहाने आणि डॉ. हेमालीनी मेहता यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor