मुंबई पालिकेच्या मंड्यांमध्ये महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रशासनाकडून हक्काची जागा उपलब्ध करून दिली जाणार असून या उपक्रमांतर्गत पालिकेने सात ठिकाणे निश्चित केली आहेत. मुंबईकरांना भाजीपाला किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी महापालिकेने मंड्यांची सुविधा केली आहे.
मुंबईत सध्या महापालिकेच्या ९१ मंड्या कार्यरत असून या मंड्यांचा पालिकेमार्फत विकास केला जात आहे. माहीमचे गोपी टैंक मार्केट, दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मार्केट, नळ बाजार परिसरातील मिर्झा गालिब मार्केट आणि ग्रँट रोडच्या लोकमान्य टिळक मार्केटचा कायापालट केला जात आहे. या पाचही मंड्यांमध्ये २ हजार ५९६ गाळेधारक आहेत. मुंबईत गरजू महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाच्या व्यवसायासाठी जागा मिळणे मुश्कील ठरते. खासगी जागा घेणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका मंड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पे अँड पार्किंगचे कंत्राट देणार
गरजू महिलांना रोजगार देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटीचे वाटप करण्यात येते. शिवाय महिलांना पालिकेच्या पे अँड पार्किंगचे कंत्राट महिला बचत गटांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात बचत गटांच्या आर्थिक सक्षमतेसाठी मंड्यात भाडेतत्त्वावर जागा देण्यात येणार असल्याने गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमतेला हातभार लागणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor