अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटायचे नावच घेत नाहीये. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांनी आता हायकोर्टात दाद मागितली आहे.
ऋतुजा लटके या महानगर पालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांचे पती रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला.
पण त्या कर्मचारी असल्यामुळे त्यांनी राजीनामा देणे आणि तो मंजूर होणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्यांचा राजीनामाच मंजूर झालेला नाही.
राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त आए. एस. चहल यांनी दिली. पण अद्याप राजीनामा मंजूर न झाल्यामुळे ऋतुजा लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 14 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.
हायकोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मुंबई हायकोर्टात ऋतुजा लटके यांच्यातर्फे दाखल याचिकेवर आज (13 ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास सुनावणी झाली.
लटके यांच्यातर्फे अॅड. विश्वजित सावंत यांनी तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.
अॅड. सावंत म्हणाले, "ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची आहे, हे त्यांनी सप्टेंबरमध्ये सांगितलं होतं. मी राजीनामा दिला. एक महिनाच्या पगार 67 हजार रूपये दिले. त्यांची रिसिट माझ्याकडे आहे."
"3 ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मी रितसर राजीनामा दिला. आता हे प्रकरण आयुक्तांकडे गेलं आहे. खरंतर हे प्रकरण आयुक्तांकडे जाण्याची गरज नाही. पण या प्रकरणात राजकारण होत आहे. पैसे भरले असतानादेखील मला राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र दिलं जात नाही,
"एखाद्या व्यक्तीला राजीनामा देऊन निवडणूक लढवायची असेल तर तुमची अडचण काय आहे," असा प्रश्न ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी विचारला.
त्यावर आम्ही त्यांच्या राजीनामा अर्जावर काहीही निर्णय घेतलेला नाही, असं उत्तर पालिकेच्या वकिलांनी दिलं.
लटके यांनी 2 ऑक्टोबरला दिलेल्या पत्रात एक महिन्याच्या नोटीसची अटी शिथिल करावी अशी मागणी केली, याचा उल्लेख अॅड. साखरे यांनी केला.
यानंतर कोर्टाने पालिकेला फटकारल्याचं दिसून आलं.
"कर्मचारी राजीनामा देतोय. त्याला निवडणूक लढवायची आहेत. आता थोडा वेळ बाकी आहे. तुम्ही निर्णय कधी घेणार, असा प्रश्न कोर्टाने BMC ला केला.
आम्ही यावर निर्णय घेण्यास तयार आहोत, असं उत्तर अॅड. साखरे यांनी देताच निर्णय नेमका कधी घेणार, असा प्रश्न कोर्टाने केला.
यावर ऋतुजा लटके यांनी नियमानुसार पैसे भरले आहेत, मग निर्णय घेण्यास अडचण काय, असा प्रश्न विचारून लटकेंच्या राजीनाम्यावर निर्णय हो किंवा नाही, हे आज दुपारी अडीचपर्यंत कळवा, असे निर्देश कोर्टाने BMC ला दिले आहेत.
मी आणि मुख्यमंत्री अंधेरी पोटनिवडणूक उमेदवार ठरवू- फडणवीस
याआधी, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की उमेदवार ठरवण्यावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे.
"आमचा कोणावरही दबाव नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाचा उमेदवार निवडणूक लढेल त्यासंदर्भात आमची आता बैठक आहे. मी आणि एकनाथ शिंदे ते ठरवू," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
निवडणूक लढणार मशाल चिन्हावरच असं ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं. महानगर पालिका कार्यालयात आयुक्तांना भेटण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की माझ्यावर दबाव आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटले नाही. आमची निष्ठा उद्धव साहेबांबरोबच आहे. माझे पती होते त्यांची निष्ठाही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबरोबरच होती", असं त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "आयुक्तांना भेटणार आहे आणि राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात विनंती करणार आहे. आजच्या आज मला सेवामुक्त करण्यात यावं असं सांगणार आहे. एका महिन्याचं वेतन जमा केलं आहे. सोमवारीच जीएडी कार्यालयात कागदपत्रं सादर केली आहेत. तीन दिवस तिथे जाते आहे. बाकी सगळी प्रक्रिया झाली आहे असं मला वरिष्ठांनी सांगितलं, केवळ सही बाकी आहे असं सांगण्यात आलं".
"राजीनाम्यात तांत्रिक त्रुटी आहेत का याबाबत मला कल्पना नाही. आयुक्तांना भेटल्यावर गोष्टी स्पष्ट होतील. भेटीनंतर तुम्हाला सांगू शकेन," असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान "3 ऑक्टोबरला ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज आला. नियमांप्रमाणे 30 दिवसात यावर निर्णय घेता येतो", असं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं. या निर्णयासंदर्भात कोणताही राजकीय दबाव नाही असंही त्यांनी सांगितलं.
ऋतुजा लटके यांची अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सकाळी 11 वाजता होणार सुनावणी होणार आहे. सर्व प्रतिवादींना याचिकेची प्रत आजच उपलब्ध करून देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
'प्रशासन दबावाखाली काम करतंय, लोकशाहीला काळिमा'
"महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा लटके मॅडमनी दिला आहे. याबरोबरीने त्यांनी एक महिन्याचं वेतन महापालिकेच्या कोशागरात जमा केलं आहे. असं असूनही प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.
राजीनामा मंजूर का करत नाही असा प्रश्न विचारला. प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ते गप्प राहतात. याचा अर्थ त्यांच्यावर दबाव आहे. प्रशासन लोकशाहीत दबावाखाली वागायला लागलं तर संसदीय लोकशाही कशी टिकणार?", असा सवाल शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.
"देशाची परिस्थिती हीनकारक आहे. अशाच पद्धतीने प्रशासन काम करतंय. दबावाखाली काम करत असेल तर लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना फक्त वाचण्यासाठीच आहे की काय.
एकंदरीत संविधानाचा याठिकाणी अवमान केला जातोय. प्रशासन जाणीवपूर्वक लटके मॅडमचा राजीनामा मंजूर करत नाहीये असा आमचा ठाम आरोप आहे. महाराष्ट्रात जे घडतंय ते लोकशाहीला काळिमा फासणारं आहे", असं त्यांनी सांगितलं.
"कायदेशीर सल्ला घेऊन पुढची प्रक्रिया केली जाईल. प्रशासनाची मुजोरी सुरू आहे आणि मी त्याचा निषेध करतो. अंधेरी निवडणुकीसाठी निश्चितच उमेदवारी अर्ज दाखल करणार. लटके मॅडमचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे. अर्ज भरताना तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊ. त्यानंतर निर्णय घेऊ", असं महाडेश्वर म्हणाले.
"वेळ ढकलून पुढे जायचं असं त्यांचं वागणं आहे. महापालिका आयुक्तांना एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर, महिनाभराचा कालावधी कमी करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. वेतन भरलं तर एक महिन्याची मुदत कमी करता येते. ती काठिण्यपातळी नाही. आयुक्त कालावधी कमी करू शकतात", असं महाडेश्वर म्हणाले.
"आम्ही न्यायालयात जात आहोत. राजीनामा मंजूर करायलाच हवाय. पालिकेकडून कोणतंही ठोस उत्तर दिलं जात नाहीये.आयुक्तांवर दबाव असेल. विवेकशक्तीचा वापर करणं त्यांना कठीण जात असेल.
प्लॅन बी तयार ठेवायलाच लागतो. यासंदर्भात उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. राजीनामा मंजुरीचा विषय आता महत्त्वाचा. वेळकाढूपणाचं धोरण दिसतंय", असं ते म्हणाले.
अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना एकनाथ शिंदे गट आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्यांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून दबावही टाकला जात आहे, असा आरोप शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी केला आहे.
आज (12 ऑक्टोबर) आयोजित एका पत्रकार परिषदेत परब बोलत होते.
अनिल परब काय म्हणाले?
ऋतुजा लटके यांची उमेदवारी आम्ही जाहीर केली होती. रमेश लटके हे एकनिष्ठ शिवसैनिक होते. तीन टर्म नगरसेवक आणि दोन टर्म आमदार होते. म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असा निर्णय घेतला होता.
ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत लिपिक म्हणून काम करतात. आम्ही त्यांना कळवल्यानंतर त्यांनी 2 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
माझा राजीनामा निवडणूक झाल्यानंतर मंजूर करावा, असं त्यांनी पत्रात कळवलं होतं.
ही काय राजीनामा करण्याची पद्धत नाही. त्यामुळे त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिला. त्यांची पूर्वीची नोटीस स्वीकारली गेली नाही. एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नसेल, तर एका महिन्याचा पगार जमा करावा, असा नियम आहे. त्यानुसार त्यांनी सर्व कागदपत्रे जमा केली आहे.
ही संपूर्ण फाईल तयार आहे, पण महापालिका आयुक्तांवर राजीनामा मंजूर न करण्याचा दबाव आहे. या दबावापोटी त्यांचा राजीनामा मंजूर होत नाही. त्या क वर्गात असल्याने हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही. हा विषय जॉईंट कमिश्नरकडे येतो. पण फाईल इकडून तिकडे पाठवण्याचं काम सुरू आहे.
मात्र, अर्ज भरण्याची मुदत 2 दिवसांत संपणार असल्यामुळे त्यांनी हा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारावा. ऋतुजा लटके यांना घाबरण्याचं काय कारण आहे?
आमच्याकडून निवडणूक लढवा, तर राजीनामा मंजूर करू, असं त्यांना सांगितलं जात आहे. त्यांना मंत्रिपदाचंही आमिष दाखवण्यात येत आहे. ऋतुजा लटके या ठाम आहेत. त्या आमच्यासोबतच आहेत. पण, ऋतुजा लटके यांना निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे.
या प्रकरणी आज आम्ही कोर्टातही गेलो आहोत. लटके या आमच्या संपर्कात आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला, तर त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनच निवडणूक लढतील. राजीनामा मंजूर झाला नाही, तर इतर पर्यायही शिवसेनेकडे आहेत, असं परब यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात?
अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आलीये. मुंबई महापालिका कर्मचारी असल्याने त्यांच्या उमेदवारीत प्रशासकीय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप पालिकेने मंजूर केलेला नाही. राजीनामा मंजूर झाल्याशिवाय त्या निवडणूक लढू शकणार नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांची पळापळ सुरु झालीये.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झालाय का? या प्रश्नावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे."
ऋतुला लटके शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षात अंधेरीची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातेय. शिंदे गटानेही या जागेवर आपला दावा सोडलेला नाही.
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीत अडचण काय?
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे, त्या मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला.
मात्र, त्यांचा राजीनामा अर्ज अजूनही मुंबई महापालिकेकडून मंजूर करण्यात आलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे, सरकारी कर्मचारी असल्याने राजीनामा मंजूर झाल्याशिवाय ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची धावाधाव सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परब आणि इतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतलीये. त्याचसोबत सामान्य प्रशासन विभागात राजीनामा लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी पळापळ सुरू केलीय.
शिवसेना नेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके मुंबई महापालिका उपायुक्त कार्यालयात त्या क्लर्क पदावर कार्यरत आहेत. हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे पालिका आयुक्त राजीनाम्यावर निर्णय घेतील.
ऋुतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका आयुक्तांनी नामंजूर केल्यास, येणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऋुतुजा लटके यांच्या उमेदवारीत असलेल्या प्रशासकीय अडचणींबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "महापालिका आयुक्तांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला पाहिजे. राजीनामा मंजूर करण्यात अडवणूक करणं योग्य नाही." या आधी अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन निवडणुका लढवल्या आहेत.
"ऋतुजा यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलाय. पालिका आयुक्तांनी राज्य सरकारच्या गन पॉइंटवर काम करू नये," असं किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या.
ऋुतुजा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले पालिका आयुक्त?
ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत बीबीसी मराठी ने पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, "ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे."
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पालिका अधिकारी म्हणाले, ऋतुजा लटके क्लास-3 (तृतीय क्षेणी) कर्मचारी आहेत. त्यांना एक महिन्याचा नोटीस पिरिएड किंवा नोटीस पिरिएड माफ केल्यास एक महिन्याचा पगार द्यावा लागेल. त्यासाठी मुंबई महापालिकेला त्यांचा राजीनामा मंजूर करावा लागेल.
शिंदे गट लढवणार अंधेरीची निवडणूक?
राजकीय जाणकारांच्या मते अंधेरीची पोटनिवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट पहाता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचा मानली जात आहे.
वरिष्ठ राजकीय विश्लेषक निखिल वागळे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "उद्धव ठाकरेंसाठी अंधेरीची पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि कसोटीची असणार आहे. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाची पुढील खरी कसोटी आहे."
भाजपने अंधेरी पोट निवडणुकीसाठी मुरजी पटेल उमेदवार असतील असं जाहीर केलंय. तर, दुसरीकडे शिंदे गटानेही अंधेरीच्या जागेवर दावा सोडला नसल्याचं म्हटलं. पण भाजपने उमेदवार दिल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलंय.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी, आम्ही अंधेरीच्या जागेवर दावा सोडणार नाही. कोणी उमेदवार जाहीर केला म्हणजे तो अंतीम निर्णय होत नाही असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांना टोला हाणलाय.
अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालंय. पण, ठाकरे विरुद्ध शिंदे हा सत्तासंघर्ष पहाता ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून दोन्ही गट पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत?
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका केशरबेन यांनी साधारण 2015-16 या काळात काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.
मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन या 2012 साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका होत्या.
त्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल दोघंही भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं. कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. तर 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
अंधेरी पूर्व मतदारसंघातून रमेश लटके 2014 आणि 2019 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
ऋतुजा लटके या यापूर्वी राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्या मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होत्या. परंतु रमेश लटके वयाच्या 21 व्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचाही राजकारणाशी जवळून संबंध राहिला आहे.
आगामी काळात या निवडणुकीवरून राजकारण आणखी तापलेलं दिसेल. शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह बदलल्याने शिवसेनेला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे. तर एकनाथ शिंदे गट या निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा करणार की केवळ भाजपाला मदत करण्यासाठी ही त्यांची राजकीय खेळी होती हे सुद्धा पुढील काळात स्पष्ट होईल असं जाणकार सांगतात.