गेल्या महिन्यात चालत्या ट्रेनमध्ये आपल्या वरिष्ठ आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणारा RPF कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरी याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गुरुवारी माहिती देताना, एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, चेतन चौधरीला नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी सोमवारी जारी केले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार चेतन चौधरी हा यापूर्वीही अनुशासन भंगाच्या किमान तीन घटनांमध्ये सामील होता. चेतन याने 31 जुलै रोजी सकाळी पालघर स्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील आपले वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीणा आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे.
गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरवाला, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख यांचा समावेश आहे. तिघेही ट्रेनच्या वेगवेगळ्या बोगीतून प्रवास करत होते. त्यानंतर सरकारी रेल्वे पोलिसांनी चेतन चौधरीला अटक केली. या हृदयद्रावक घटनेमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
आरोपी चेतन चौधरी याने आधी आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकीराम मीणा आणि बी5 कोचमधील एका प्रवाशाला त्याच्या सर्व्हिस शस्त्राने गोळ्या घालून ठार केले. जीआरपीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने ट्रेनच्या पॅंट्री कारमधील आणखी एका प्रवाशाला आणि S6 कोचमधील आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. चेतन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.