महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे घंटानाद करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिन्दुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. अशा घटनांचा तपास पोलीस निःपक्षपातीपणे करत असल्याचे हवाले देतात. मुंगेरसारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो! अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.
तसेच आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.