मुंबईतील बॉलिवूड उद्योगाला खिळखिळे करण्यासाठी बदनामीचा मोठा कट रचण्यात आला आहे. शिस्तबद्ध रित्या बॉलिवुडमधील कलाकारांना लक्ष्य केले जात असल्याचा भक्कम पुरावाच समोर आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या एका कर्मचाऱ्याने तब्बल चार पानी पत्र लिहिले असून त्यात या सर्व प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतरची चौकशीपासून ते आतापर्यंतचा सर्व प्रवास आणि विविध घटना, व्यक्ती तसेच कारवाई याचे संपूर्ण वर्णन या कर्मचाऱ्याने केले आहे. एनसीबीचा कारभार कसा सुरू आहे, त्याचाही पर्दाफाश याद्वारे करण्यात आला आहे. त्यात वानखेडे यांचा कारभार आणि भूमिका याविषयीही तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असून देशहित लक्षात घेता याची दखल घ्यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्याने केली आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवाब मलिक, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे यांना पत्र पाठविले आहे. या सर्व बाबींची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी या कर्मचाऱ्याने पत्राद्वारे केली आहे.