ब्रिटिशकालीन कर्नाक पूल तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जीद बंदर रेल्वेस्थानका दरम्यानचा मेगाब्लॉक अखेर १७ तासांनी संपला आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पूल तोडण्याचे मध्ये रेल्वेचे नियोजन यशस्वी झाल्याने ठरलेल्या वेळेपूर्वी जवळपास दहा तास अगोदर सीएसएमटीवरून ठाण्याला दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी पहिली लोकल निघाली, तर हार्बर मार्गावरून सायंकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी पहिली लोकल पनवेलला रवाना झाली.
मध्य रेल्वेवरील या मेगाब्लॉकचे नियोजन गेले काही दिवस सुरू होते. मात्र, गेल्या आठवड्यात रेल्वेने त्याचे वेळापत्रक जाहीर केले. राज्यभरात, परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ३५ एक्स्प्रेस रद्द केल्याने, अनेक गाड्या मधूनच मागे वळवल्याने आणि अनेक लोकल रद्द करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे जाहीर केल्याने या मेगाब्लॉकचा संपूर्ण राज्याला फटका बसला. या काळात प्रत्येक स्थानकात बंदोबस्त वाढवल्याने, प्रवाशांना मार्गदर्शनासाठी पोलिस नेमल्याने, मदत कक्ष ठेवल्याने आणि नेहमीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने उद्घोषणा करण्यात आल्याने तुलनेने या काळात प्रवाशांना दिलासा मिळाला.
Edited By -Ratnadeep Ranshoor