rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत आज केवळ 'या' 5 केंद्रांवरच लसीकरण सुरू

Vaccination starts today at only 5 centers in Mumbai
, शनिवार, 1 मे 2021 (10:26 IST)
मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लशींच्या मोजकाच मात्रांचा नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे 1 मे 2021 रोजी महापालिकेच्या 5 लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे, असं मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप'मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.
 
"भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे," असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
 
मुंबईत 1 मे रोजी 'या' 5 केंद्रांवरच लसीकरण सुरू -
1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
 
2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
 
3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
 
4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
 
5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर
 
मुंबईत पुढचे 3 दिवस लसीकरण बंद, साठा संपल्याने महापालिकेचा निर्णय
दरम्यान, 29 एप्रिल रोजी मुंबई महापालिकेनं सांगितलं होतं की, कोव्हिड -19 च्या लसीकरण मोहीमेसाठी पुरेसा लस साठ उपलब्ध नसल्याने 3 दिवस मुंबईतली सगळी लसीकरण केंद्र बंद राहणार आहे.
 
मात्र, नव्या माहितीनुसार, वरील 5 केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.
 
मुंबईतली कोणती केंद्र दुसऱ्या दिवशी सुरू राहतील, कुठे मर्यादित साठा आहे याविषयीची माहिती महापालिकेकडून आदल्या रात्री जाहीर करण्यात येते. त्यानुसार वरील केंद्र जाहीर करण्यात आले आहेत.
 
गुरुवारीही (29 एप्रिल) मुंबईतली 40 खासगी लसीकरण केंद्रं साठ्याअभावी बंद ठेवण्यात आली होती. तर बुधवारी रात्री उशीरा काही प्रमाणात साठा आल्यानंतर शासकीय केंद्र साठा असेपर्यंत सुरू राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
 
लस उपलब्ध होताच दुसरा डोस घेणाऱ्या आणि 45 वर्षांवरील नागरिकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहन पालिकेने केलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातच्या कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू