Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

Marine Drive
, शुक्रवार, 5 जुलै 2024 (14:21 IST)
मरीन ड्राईव्हवर एवढी गर्दी मी कधीच पाहिली नव्हती. अगदी मुंबई मॅरेथॅानच्या दिवशीही नाही.
 
मरीन ड्राईव्हचा किलाचंद चौक जिथून रस्ता सरळ चर्चगेट स्टेशनकडे जातो, त्या सिग्नलजवळ पाचच्या आधीच बरीच गर्दी जमा झाली होती.
 
वानखेडे स्टेडियमलकतही रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि काहीशी गोंधळासारखी स्थिती होती. दोन्ही ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीसांच्या नाकी नऊ येताना दिसत होतं.
 
स्टेडियमच्या गेट नंबर 2, 3 आणि 4 मधून सामान्य लोकांना प्रवेश दिला जाणार होता. ही गेट्स 4 वाजता उघडणार होती आणि लोकांना 6 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल असं आधी सांगण्यात आलं होतं.
 
पण तिथे दुपारी 2-2:30 वाजल्यापासूनच लोक जमा झाले होते. प्रवेश सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच स्टेडियम भरल्याचं आतमध्ये पोहोचलेल्या लोकांनी मला सांगितलं.
 
आम्ही तोवर नरीमन पॅाइंटला पोहोचलो होतो. हे मरीन ड्राईव्हचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे आणि इथूनच परेड सुरू होणार होती.
 
या परिसरातील कार्यालयांतले कर्मचारी 2–3 वाजताच घरी निघाले होते. बसस्टॅंडसमोर रांगा लागल्या होत्या.
 
मी आणि कॅमेरामन शार्दूलनं नरीमन पॅाइंटजवळून चाहत्यांशी लाईव्ह बातचीत केली. तेव्हा आसपास अजूनही परेडची तयारी सुरू होती. बोर्ड्स लावले जात होते. झाडांच्या फांद्या तोडल्या जात होत्या.
 
4:30 वाजता आम्ही तिथून निघालो आणि वानखेडेच्या दिशेनं गाडीतून निघालो. हा रस्ता तोवर गाड्यांसाठी बंद केला होता आणि उरलेल्या गाड्या मंत्रालयाकडे वळवल्या जात होत्या.
 
गर्दी पाहता आम्ही गाडी सोडून चालू लागलो. रोजचा ट्रेनचा प्रवास आणि गर्दीत कसं वावरायचं याचं विशेष ट्रेनिंग इथे उपयोगी आलं.
 
किलाचंद चौकातल्या पोहोचलो, तोवर तिथे गर्दी ओसंडून वाहात होती. आम्ही कसेबसे रस्ता ओलांडून चर्चगेटच्या वाटेवर आलो. तिथून स्टेशनकडे आणि मग पुढे सीएसएमटीकडे प्रेस क्लबपाशी जाऊन थांबलो. हा भाग वानखेडेवासून दीड किलोमीटरवर आहे पण स्टेडियममधला घोषणा आणि गाण्यांचा आवाज तिथेही ऐकू येत होता.
 
आम्ही आलो तेव्हा संपूर्ण रस्त्यावर जणू चाहत्यांचे लोंढे येत होते. चर्चगेट स्टेशनवर घोषणा केल्या जात होत्या की मरीन ड्राईव्हवर जाऊ नका, गर्दी वाढली आहे.
 
अनेकांनी ऐकले आणि मागे फिरले. पण गाडीतून भरभरून लोक येतच होते.
 
एवढी गर्दी पाहून भीतीही वाटली. मरीन ड्राईव्ह तसा विस्तीर्ण आहे, पण तेवडे लोक मावतील का? कुणी समुद्रात पडणार नाही ना असा विचारही आला. अखेर रात्री माहिती मिळाली की कारी ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती होती आणि 8-9 जणांना गुदमरणे, चक्कर येणे असा त्रास झाल्याने रुग्णालयात न्यावे लागले.
 
मोठी दुर्घटना झाली नाही, याला कदाचित मुंबईकरांना गर्दीची असलेली सवय आणि पोलिस यंत्रणेचा अनुभव या गोष्टी कारणीभूत असाव्यात.
 
मुंबईत पोलिसांना गर्दी हाताळण्याचे सवय झाली आहे. मरीन ड्राईव्हवर काही स्वयंसेवक आणि अन्य सुरक्षारक्षकही मदतीला आले. त्या सर्वांचं खरंच कौतुक वाटतं. एवढ्या गर्दीतही त्यांनी ॲंब्युलन्स व्यवस्थित बाहेर काढली, हे लक्षणीय होतं.
 
पोलीसांना गर्दी हाताळण्याचा अनुभव असला तरी त्यांची काही वेळा खरंच कसोटी लागत होती.
 
अनेकजण सोशल मीडियावर जमलेल्या लोकांनाच दोष देत आहेत. पण तसं करता येणार नाही. याचं कारण केवढी गर्दी जमली आहे हे मरीन ड्राईव्हवर पोहोचल्याशिवाय बहुतेकांना समजलही नसतं.
 
अनेकजण तिथे आले ते वानखेडेवर फ्री एंट्री मिळेल म्हणून. काहींना रस्त्यावर टीमसेबत आनंद साजरा करायचा होता.
 
पण किती लेक जमतील याचा अंदाज BCCI आणि सरकार या दोघांनाही आला नाही, हे उघड आहे. अन्यथा आणखी चांगली व्यवस्था ठेवता आली असती.
 
मला आता प्रश्न पडतो, एका दिवसात अशी परेड ठेवण्याची घोषणा करणं योग्य होतं का? ही संध्याकाळी ठेवणं योग्य होतं का? केवळ 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड ठेवणं योग्य होत. का?
 
मला आठवतंय, 2007 साली एयरपोर्ट ते वानखेडे असं 30 किमी अंतरावरून परेड नेली होती. त्यामुळे गर्दी विखुरली होती. 2011 साली कुठलं विशेष आयोजन केलेलं नसताना मंच जिंकल्यावर वानखेडे ते टीम हॅाटेल अशी रात्रीच विजययात्रा निघाली होती. मुंबई तेव्हा अख्खी रात्र जागली होती.
 
पण तो सोशल मीडिया पसरण्याच्या आधीचा काळ होता. तेव्हा लोक थांबून फोटो काढत होते पण रील्ससाठी गर्दी करत नव्हते.
 
काल मी तिसऱ्यांदा विश्वचशकाचं सेलिब्रेशन पाहिलं. ते अभूतपूर्व, आनंददायी आणि भीतीदायकही होतं.
 
‘गर्दीत जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार’
आमदार सत्यजित तांबे यांनी या गर्दीवर प्रशासनाने धोका कसा पत्करला असा प्रश्न उपस्थित केला.
 
त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, “मुंबईमध्ये दुसरं हाथरस झालं नाही त्याबद्दल देवाचे आभार. हाथरसच्या घटनेत 121 जणांनी प्राण गमावल्याला एक दिवसच झाला असताना वानखेडे स्टेडिअमवर ‘फर्स्ट कम, फर्स्ट बेसिसवर’ प्रवेश देत प्रशासन इतका मोठा धोका कसं पत्करू शकते? हे आपल्या देशावरचं किंवा क्रिकेटवरचं प्रेम नाही, तर पूर्णपणे वेडेपणा आहे. गोंधळ आणि गर्दीच्याऐवजी आपण सुरक्षा आणि शहाणपणाला प्राधान्य देऊया.”
 
दुसरीकडे या गर्दीवेळी चेंगराचेंगरी झाली नाही परंतु चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं पोलिसांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
झोन 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "नरीमन पाॅईंट येथे कुठेही चेंगराचेंगरी झालेली नाही. परंतु चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जागोजागी पोलीस तैनात होते. ठिकठिकाणी बॅरीगेटींग आणि इतर बंदोबस्त पोलिसांनी केला होता."
 
तसंच गर्दीत अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती आहे. 11 जणांवर काल जवळच्या जीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
जेजे हॉस्पिटलच्या डीन पल्लवी सापळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,"कालच्या कार्यक्रमातून एकूण 11 जणांवर उपचार केले आहेत. काल जीटी रुग्णालयात 9 जण किरकोळ जखमी होते. त्यांच्यावर उपचार करून, एक्स-रे काढून त्यांना घरी सोडून दिलं आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल करून घेतलं आहे. यापैकी एक जण एका न्यूज चॅनेलचा कॅमेरामन आहे. तर आणखी एक जण जेजे रुग्णालयात दाखल आहेत. कोणीही गंभीर जखमी नाही."
 
'ऑफिसची बॅग गेली'
"मी थेट ऑफिसमधून मरीन ड्राईव्हला आलो. पाच वाजतापासून इथं गर्दी वाट पाहत होती. आम्हाला 5-6 वाजता इंडियन टीम इथं येईल अशी माहिती होती. पण, टीम पोहोचली नाही. इथं गर्दी वाढत होती. गर्दी कुठून आली आणि कुठून जाणार आहे याची काहीही माहिती नव्हती. इंडियन टीमची बस इथून गेली तेव्हा आम्ही बाहेर निघायची जागा शोधू लागलो. जागा मिळत नव्हती म्हणून लोक ओरडायला लागले. काही लोक खाली पडले. कोणालाही आवाज जात नव्हता. आम्ही कसे बाहेर पडलो माहिती नाही. माझी ऑफिस बॅग देखील चोरी गेली. इथं काही लोकांना चक्कर आली होती."- रवी सोळंकी
 
Published By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?