Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंडिया आघाडी बैठक : लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत- उद्धव ठाकरे

uddhav thackeray
, बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (19:41 IST)
इंडिया या विरोधकांच्या आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "28 पक्षांचे 63 प्रतिनिधी उपस्थित राहतील. या आघाडीमुळे देशात एक पर्याय तयार होईल. यामुळे परिवर्तन होण्यास मदत होईल."
 
उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले, “रक्षाबंधन केवळ एका दिवसासाठी असायला नको. महिलांना आपल्या देशात सुरक्षित वाटलं पाहिजे असं शासन पाहिजे. दुर्देवाने असं शासन आता आपल्या राज्यात दिसत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं गेलं होतं की मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घ्या. मी असं म्हटलं होतं की बिल्कीस बानोकडून राखी बांधून घ्या. मणिपूरच्या महिला, महिला कुस्तीपटू यांना दुर्लक्ष केलं गेलं. देशावर प्रेम करणारे सगळे लोक एकत्र आले आहेत. आम्ही हुकुमशाही विरोधात आहोत. गॅस सिलेंडरचे दर कमी झाले. आगामी काळात आमच्या बैठकीनंतर हळूहळू सिलेंडर फ्रीमध्ये देतील. कारण ते सरकारही गॅसवर आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्याचं सरकार काय करत आहे, पंतप्रधान काय करत आहेत.”
 
ते म्हणाले, आमची विचारधारा वेगवेगळी आहे पण आमचा उद्देश एकच आहे. ब्रिटिश विकास करतच होते पण त्यापेक्षा जास्त आम्हाला स्वातंत्र्य हवं होतं. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
 
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तसेच शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.
 
ही बैठक महाराष्ट्रात होत आहे याचा आनंद असल्याबद्दल नाना पटोले यांनी सांगितलं. इंडिया आघाडीत नेत्यांनी येणं सुरूच आहे. आता 28 मित्रपक्ष यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं.
 
जशी रक्षाबंधनामध्ये बहीणीचं रक्षण करणं भावाची जबाबदारी असते तशी इंडियाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे असं विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. ते म्हणाले, शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेत इंडिया आघाडी पुढे नेण्याचा आमचा विचार आहे. महागाई, बेरोजगारी या मुद्यांवर आवाज उठवत आलो आहोत. इतिहास पाहिला तर 2019 निवडणुकीत या आघाडीत जे पक्ष आहेत त्यांना मिळून 23 कोटी 40 लाख मतं दिली होती. तर याच निवडणुकीत भाजपला 22 कोटी 90 लाख मतं दिली होती.
 
कोणाला केवळ विरोध करणं हा आमचा अजेंडा नाही. तर विकास करणं हा सुद्धा आमचा अजेंडा आहे. फॅसिस्ट शक्तीला रोखणं हाही आमचा उद्देश आहे.
 
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत इंडिया (India) आघाडीची बैठक होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे या बैठकीचं यजमानपद आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसकडेही महत्त्वाची जबाबदारी आहे.
 
पटना आणि बेंगळुरूनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक मुंबईत होत आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही बैठक महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 
या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं आहे? किती पक्ष आणि किती नेते यासाठी मुंबईच दाखल होतायत? आणि राज्यातील महाविकास आघाडीसाठी ही बैठक महत्त्वाची का आहे? जाणून घेऊया.
 
कशी असेल बैठक?
बुधवारी 30 ऑगस्टपासूनच काही नेत्याचं मुंबईत आगमन सुरू झालं आहे. तर 31 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांचे इतर नेते मुंबईत दाखल होतील. या दिवशीची बैठक ही अनौपचारिक असेल.
 
31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाकडून विविध पक्षांच्या नेत्यांचं स्वागत केलं जाईल.
 
साडे सहा वाजल्यानंतर इंडिया (INDIA) आघाडी लोगोचं (चिन्ह) अनावरण करण्यात येईल.
 
रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल.
 
1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची औपचारिक बैठक होईल. सकाळी पावणे अकरा वाजता समूह छायाचित्र यासाठी नियोजन करण्यात आलं आहे.
 
यानंतर ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीची मुख्य परिषद असेल.
 
दुपारी 2 नंतर दुपारचे जेवण. यानंतर 3.30 वाजता पत्रकार परिषद होईल.
 
दरम्यान, या बैठकीचं यजमानपद उद्धव ठाकरे गटाकडे आहे. तर सर्व नेत्यांच्या स्वागताची आणि प्रवासाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर 1 तारखेच्या दुपारच्या जेवणाची जबाबदारी महाराष्ट्र काँग्रेसकडे आहे.
 
1 तारखेच्या बैठकीनंतर आणि पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात टिळक भवन येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
 
कोणते नेते उपस्थित राहणार?
देशातील 26 राजकीय पक्षांचे प्रमुख आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे अनेक नेते 31 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहेत.
 
या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आणि मुंबईतील ग्रँड हयात हाॅटेल परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
पोलीस सुरक्षेच्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी मविआच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती.
 
31 तारखेला मुंबईत 150 हून अधिक राजकीय नेते मुंबईत दाखल होणार आहेत.
 
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि इतर अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील.
 
बैठकीत नेमकं काय होणार?
विरोधी पक्षांतील एकूण 26 राजकीय पक्षांची मिळून इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance) आघाडी तयार झाली. यात 2 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्ष आहेत.
 
यात सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि 142 खासदारांचा समावेश आहे.
 
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देणासाठी देशातील विरोधी पक्ष या आघाडी अंतर्गत एकत्र आलेत.
 
26 पक्षांमध्ये समन्वय रहावा आणि सुरळीत संवाद व्हावा यासाठी या आघाडीचा संयोजक कोण असेल? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने मुंबईतील बैठकीत आघाडीत पक्ष चर्चा करण्याची शक्यता आहे.
 
तसंच संजोयक पद कोणत्या पक्षाकडे जाईल यावरूनही सध्या चर्चा सुरू आहे. तसंच यासाठी 11 जणांची समिती सुद्धा मुंबईतील बैठकीत निश्चित केली जाणार आहे.
 
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहे.
 
यामुळे मुंबईतील राष्ट्रीय पक्षांच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत काही फाॅर्म्युला ठरतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.
 
दरम्यान, निवडणुकीसाठी जाहीरनाम्यावरही या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं,
 
"31 तारखेला आमची अनौपचारिक बैठक होईल. 1 सप्टेंबर रोजी औपचारिक बैठक होईल. यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल. आतापर्यंत दोन बैठक झाल्या आहेत. आता मुंबईतील तिसऱ्या बैठकीत आगानी रणनितीवर चर्चा होईल. इंडिया आघाडीचा एक लोगो तयार केला आहे."
 
तर देशभरातून येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.
 
यासंदर्भात माहिती देताना खासदार संजय राऊत म्हणाले, "लालू प्रसाद यादव, डाॅ. फारूक अब्दुल्ला मुंबईत दाखल झालेत. आज संध्याकाळी ममता बॅनर्जी येणार आहेत आणि उद्या दुपारपर्यंत इतर सर्व नेते पोहचतील. महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने सर्व मान्यवरांचं स्वागत आणि मानसन्मान केला जाईल. 2024 मध्ये मोदी-शहा राजवटीचा पराभव झालेला असेल, त्यादृष्टीने महाविकास आघाडीची पावलं पडत आहेत."
 
महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढेल पण...
महाविकास आघाडी एकत्र आहे, आगामी निवडणुका एकत्र लढवणार असा संदेश देण्यासाठी मविआने काही महिन्यांपूर्वी 'वज्रमूठ' सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.
 
परंतु अशी केवळ एकच सभा पार पडली आणि यानंतर वाढत्या तापमानाचं कारण देत पुन्हा मविआची 'वज्रमूठ' सभा झालीच नाही.
 
यानंतर काही दिवसातच 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले.
 
अजित पवार गटाच्या बंडानंतर शरद पवार यांच्या काही वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
 
परंतु यानंतर शरद पवार यांनी कोल्हापूर येथे जाहीर सभा घेतली आणि आपण विरोधी गटांसोबतच असल्याचा संदेश दिला. परंतु या दरम्यान यामुळे महाविकास आघाडीत मात्र अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.
 
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने 'प्लॅन बी' साठी तयारी सुरू केली अशाही बातम्या समोर आल्या.
 
आता इंडिया आघाडीच्या बैठकीच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत विस्कळीत दिसत असलेली महाविकास आघाडी पुन्हा एकत्रित दिसते आहे. यामुळे इंडियाची ही बैठक राज्यातील महाविकास आघाडीच्या मजबुतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "महाविकास आघाडीतले सगळे नेते या बैठकीसाठी एकत्र येतायत. आतापर्यंत तीन पक्ष स्वतंत्रपणे सभा घेत होते, दौरे करत होते, आता तीन पक्षाचे नेते एकत्र दिसत आहेत. यामुळे मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच आत्मविश्वास वाढेल. तसंच सत्ताधारी पक्षांवरही दबाव वाढेल."
 
परंतु तरीही महत्त्वाचा मुद्दा किंवा कळीचा मुद्दा हा आगामी काळात जागा वाटपाचा राहील. तीन पक्षांसमोर लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप निश्चित करणं हे आव्हान आहे. हे आव्हान कसं पेलतात यावरच मविआचं भवितव्य अवलंबून आहे.
 
संदीप प्रधान सांगतात, "वेगवेगळ्या राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतील असं मला वाटतं. या बैठकीमुळे महाविकास आघाडी एकत्र राहील हा संदेश लोकांपर्यंत जाण्यास मदत होईल. पण जागा वाटपासाठी मविआच्या नेत्यांना समजूतदारपणा दाखवावा लागेल. जिथे ज्याची जास्त ताकद तसं जागा वाटप करावं लागेल."
 
महत्त्वाच म्हणजे मविआतील दोन प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आता दोन गट झालेत. यामुळे दोन्ही पक्षांना नवीन चेहऱ्यांना संधी देता येणार आहे.
 
"पक्षातील फुटीचा फायदा दोन नेते कसे करून घेतात, नवीन सुशिक्षित, पक्षाला वेळ देणारे, कष्टाळू अशा चेहर्‍यांना संधी दिली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक ट्रांसफाॅर्मेशन आपल्याला दिसू शकतं," असंही प्रधान सांगतात.
 
आता इंडिया आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरतं, आणि याचा फायदा राज्यात महाविकास आघाडी कसा करून घेतं हे पहावं लागेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबई सज्ज