करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रविवारी मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात आयोजित करण्यात येणार्या मुंबई दर्शनसारख्या सर्व प्रकारच्या सहलींवरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, देश भरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली असून त्यात महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे.
करोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
तसेच मुंबईत निघणार्या सर्व सहली रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत येणार्या पर्यटकांसाठी मुंबई दर्शन सहली आयोजित करण्यात येतात. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या सहली रद्द करण्याचे आदेश पोलिसांनी सर्व सहल आयोजकांना दिले आहेत.