एखादा पुरुष जेव्हा महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे बघतो त्यावेळी त्याचा हेतू नक्की काय आहे, हे महिलेला समजते. स्त्रियांना निसर्गाने दिलेली ही देणगीच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवले आहे.
उद्योगपती विकास सचदेव यांनी 2017मध्ये एका अभिनेत्रीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सचदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे.
महिलेने विमानतळ प्रशासनाकडे किंवा विमानातील कोणत्याही कर्मचार्याकडे तक्रार केली नाही. उलट हसतमुखाने ही महिला विमानातून उतरली, असे सचदेव यांच्या वकिलाने कोर्टाच्या निरीक्षणास आणून देण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने हा मुद्दा निकाली काढला. अशा घटना घडल्यावर महिलांनी कसे वागले पाहिजे याचा काही फॉर्म्युला नसल्याचे कोर्टाने म्हटले. डिसेंबर 2017मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात सत्र न्यायालयाने सचदेव यांना दोषी ठरविले असून, तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.