हैदराबादमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी येथे छापा टाकला असून 142 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अनेक व्हीव्हीआयपी, अभिनेते, राजकारणी यांच्या मुलांचा समावेश आहे. हैदराबादच्या बंजारा हिल येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही पार्टी सुरू होती. रिपोर्ट्सनुसार, पार्टीमध्ये अनेक प्रतिबंधित ड्रग्सचा वापर केला जात होता. पार्टीत वीड, कोकेन यांसारखे नशे केले जात होते.
वृत्तानुसार, अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला, जी मेगास्टार चिरंजीवीची भाची देखील आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या छापेमारीनंतर नागा बाबूने आपल्या मुलीचा ड्रग्जशी काहीही संबंध नसल्याचा व्हिडिओ जारी केला. बिग बॉस तेलुगूच्या तिसऱ्या सीझनचा विजेता गायक राहुल सिपलीगुंज यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वर्षी 12 फेब्रुवारी रोजी त्याने हैदराबाद पोलिसांचे थीम सॉंग देखील गायले होते जे अंमली पदार्थांच्या विरोधात आहे.
याशिवाय ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यात एका उच्च पोलीस अधिकाऱ्याची मुलगी, टीडीपी खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता, मात्र त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ते म्हणाले की, शहरातील सर्व पब बंद करावेत. हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी बंजारा हिलचे एसएचओ शिव चंद्रा यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
photo: ANI