Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उष्णतेच्या लाटेने 68 जणांचा जीव गेलाय, दवाखाना रुग्णांनी भरलाय – ग्राऊंड रिपोर्ट

hot dead
, गुरूवार, 22 जून 2023 (22:06 IST)
अनंत झणाणे
BBC
उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेने 68 लोकांचा जीव गेलाय असं म्हटलं जातंय. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण अजूनही मोठ्या संख्येने रूग्ण दवाखान्यात दाखल आहेत.
 
काही दिवसांपूर्वी बलियातल्या उष्णतेच्या लाटेने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. पण अजूनपर्यंत तपास पथकाचा अहवाल आलेला नाही. दरम्यान, रूग्णालय प्रशासनाच्या कामावरही प्रश्न विचारले जात आहेत.
 
जेव्हा बीबीसीची टीम बलियाच्या सरकारी जिल्हा रूग्णालयात पोचली तेव्हा अनेक वॉर्ड रूग्णांनी भरलेले दिसले.
 
याच दवाखान्यातल्या इमर्जन्सी वॉर्डात बलिया जिल्ह्यातल्या चितवाडा गावातून आलेले हरेंद्र यादव स्ट्रेचरवर झोपलेल्या आपल्या 65 वर्षांच्या आईचे, लीलावती देवींचे, उपचार सुरू होण्याची वाट पाहात आहेत.
 
त्यांचं गाव जिल्हा रूग्णालयापासून 22 किलोमीटर लांब आहे.
 
हरेंद्र म्हणतात की, ते आधी आपल्या आईला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेऊन गेले होते पण तिथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
 
त्यामुळे ते आपल्या आईला घेऊन सरळ जिल्हा रूग्णालयात आले. ते म्हणतात, “काल आईला उलटी झाली, अंगाची लाही लाही होत होती, तिची तब्येत फारच बिघडली. आता बघावं लागेल कधी उपचार सुरू करतात. आमच्या गावात अनेक म्हातारी माणसं आजारी पडत आहेत.”
 
हरेंद्रच्या बाजूला अनिल कुमार आपल्या स्ट्रेचरवर पडलेल्या पुतण्याचे, कृष्णा कुमारचे उपचार सुरू होण्याची वाट पाहात आहेत.
 
ते म्हणतात की, कृष्णा कोणत्यातरी घरगुती समारंभासाठी बाहेर गेला होता आणि त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याचं शरीर सकाळी 10 ते 11 च्या सुमारास तापलं, मग त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात आणण्यात आलं.
 
इमर्जन्सी वॉर्डातल्या डॉक्टरांशी बोलण्याचा बीबीसीने प्रयत्न केला, पण त्यांनी कामात व्यग्र असल्याचं सांगून बोलण्यास नकार दिला.
 
बलियाच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये अनेक म्हाताऱ्या लोकांना दाखल केलं आहे.
 
याच वॉर्डमध्ये 80 वर्षांचे सुरेंद्र चौधरी आपल्या बेडवर बसलेत आणि ऑक्सिजन चालू असतानाही मोठमोठे श्वास घेत आहेत.
 
त्यांचे नातू बृजेश याद एका ओल्या उपरण्याने त्यांची पाठ पुसत आहेत. कदाचित यामुळे त्यांना थोडं बरं वाटेल आणि त्यांची ऑक्सिजन लेव्हल वाढेल अशी त्यांना आशा आहे.
 
बृजेश म्हणतात की, ते आपल्या आजोबांना 25 किलोमीटर लांब असलेल्या राजपूर गावातून घेऊन आले आहेत.
 
ते म्हणतात, “सकाळपासून यांची ऑक्सिजनची पातळी वाढत नाहीये. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. घरात बसल्या बसल्या त्यांना त्रास सुरू झाला. सगळं उष्णतेमुळे होतंय. त्यामुळे आम्ही यांचं अंग ओल्या कपड्याने पुसतोय.”
 
अकाऊटंट असणारे छट्ठू यादव आपले कॉम्प्युटर ऑपरेटर सहकारी राजेश कुमार यांना घेऊन दवाखान्यात आलेत.
 
ते म्हणतात, “कामाचा ताण आणि तीव्र उन्हामुळे त्यांची अशी परिस्थिती झालीये.”
 
सरकारी डॉक्टर काय म्हणतात?
लखनऊवरून जिल्हा रूग्णालयाची तपासणी करायला आलेले डॉक्टर केएन तिवारी यांनी म्हटलं, “तुम्ही (मीडिया) ही पाहाताय की इथे कोणी फक्त उष्माघाताने आजारी पडलेला रूग्ण नाहीये. हो, कोणाला श्वास घ्यायला त्रास होतोय, कोणी दीर्घकाळापासून आजारी आहे.
 
सांगायचा मुद्दा हा की फक्त उष्माघाताने मृत्यू होत आहेत किंवा त्याचेच पेंशट येत आहेत (असं नाहीये), इथे तशा केसेस सापडणार नाहीत.”
 
डॉक्टरांच्या या विधानावर छट्ठू यादव म्हणतात की, “स्वतः एसीमधून बाहेर पडतील तर त्यांना बाहेरची परिस्थिती काय आहे ते कळेल ना. भर दुपारी बाहेर फिरले तेव्हा खरं काय ते कळेल. फक्त गाडीतून उतरले आणि म्हणाले की इथे काही उष्माघाताच्या केसेस नाही, हे कितपत योग्य? एसी गाडीतून फिरणाऱ्याला काय कळणार दुसऱ्यांचं दुःख? शेतकऱ्यांना विचारा, सर्वसामान्यांना विचारा की उन्हाने त्यांचे काय हाल होत आहेत.”
 
आरोग्य संचालक डॉ ए के सिंह यांनी म्हटलं होतं की, ते जेव्हा मृत व्यक्तींच्या गावी गेले तेव्हा, “शांतता होती,कोणत्याही गावात अफरातफरी माजली नव्हती, लोक चिंतित नव्हते. आम्ही चार-पाच गावांमध्ये गेलो होतो.”
 
या विधानावर छट्ठू यादव म्हणतात, “आता तुम्ही कोणत्याही गावात जाऊन पहा काय परिस्थिती आहे. लोग घर सोडून बागांमध्ये राहायला गेलेत. पक्की घरं सोडून मातीच्या घरात राहात आहेत.”
 
जसं आम्ही पुढे सरकलो, आम्हाला दिसलं की एक मजूर दोन एसी घेऊन जात होता.
 
आम्ही विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तो एसी रूग्णालयाच्या स्टोअर रूममधून दुसऱ्या विभागात घेऊन जात होता. दिसायला दोन्ही एसी नवेकोरे दिसत होते.
 
एसी आहे तरीही घरातून पंखा
रूग्णालयात पुढे गेल्यानंतर आम्हाला जागोजागी, कॉरिडोरमध्ये एसी लावलेले दिसले.
 
एका वॉर्डमध्ये दाखल झालेल्या 65 वर्षांच्या अली हसन यांनी एसी असूनही घरून आपला पंखा मागवून लावून घेतला आहे.
 
ते म्हणतात, “उष्ण वारे चालू आहे, भयानक उकाडा आहे म्हणून मी आजारी पडलो. मी बाजारात जाऊन आलो, आणि मला उष्माघाताचा त्रास झाला. मला आधी श्वास घ्यायला त्रास होत होता.”
 
जितेंद्र वर्मा एक अपंग ई-रिक्षा चालक आहेत. ते म्हणतात सकाळी रिक्षा चालवायला गेल्यानंतर त्रास झाला.
 
ते म्हणतात याआधी पायाचं अधूपण वगळता त्यांना कोणताही दुसरा त्रास नव्हता.
 
जितेंद्र म्हणतात, “माझी इच्छा आहे की इथल्या सोयीसुविधा आणखी चांगल्या असाव्यात म्हणजे रूग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सरकार पूर्ण प्रयत्न करतंय पण काही निम्न स्तरावरील लोक आपल्या पातळीवर तशा सुविधा देऊ शकत नाहीयेत.”
 
स्मशानातली परिस्थिती
जिल्हा रूग्णालयापासून 6 किलोमीटर लांब गंगेच्या किनारी स्मशानघाटावर आमची भेट जितेंद्र कुमार आणि त्यांचे भाऊ देवेंद्र कुमार यांच्याशी झाली.
 
दोन्ही भाऊ काही वेळाआधीच आपले 85 वर्षांच्या वडिलांच्या चितेला अग्नी देऊन चिता विझण्याची वाट पाहात बसले होते.
 
जितेंद्र म्हणतात, “वडिलांचं वय तर झालं होतंच. त्यांना उन्हाळ्याचाही त्रास होत होता. या लोकांना उष्माघाताचा त्रास जास्त होतो. जेव्हा वीज जाते तेव्हा तरूण तर सहन करून घेतात पण म्हातारे लोक कसे जिवंत राहातील?”
 
सरकारच्या धोरणांबद्दल बोलताना जितेंद्र कुमार म्हणतात की, “सरकारच्या योजनांनुसार काम झालं तर जनता कधीच त्रस्त होणार नाही. सरकार पण त्यांचंच आहे, नेतेही त्यांचेच आहेत आणि जनताही त्यांचीच आहे. सगळे एकमेकांना सामील आहेत, सगळ्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. सगळ्यांची पोटं भली मोठ्ठी आहेत. जर सगळ्या लोकांनी आपली पोटं कमी केली तर कोणाला त्रास होणार नाही.”
 
जितेंद्र यांच्यासोबत उभे असलेले त्यांचे चुलत भाऊ देवेंद्र म्हणतात, “एकप्रकारे बलियाकडे दुर्लक्ष केलं आहे. इथे औषधउपचारांच्या काही सुविधा नाहीत. इथे मंत्री फक्त आश्वासनं देतात बाकी काही करत नाही त्यामुळे परिणामी उष्माघातामुळे अनेक लोक मरत आहेत.”
 
बलियात उष्माघाताने झालेल्या मृत्यूंच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबद्दल बोलताना जितेंद्र म्हणतात, “तपास यंत्रणांना कामाला लावतील, सरकार चौकशी करेल आणि सरकारला क्लीन चिटही मिळून जाईल. कारण अधिकारीही त्यांचे आहेत, नेतेही त्यांचे आहेत. सगळं काही सरकारचं आहे. सरकारसमोर जर विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलला तर ते म्हणतील की या मुद्द्यावरून राजकारण होतंय. पण जे सत्तेत बसलेत त्यांना उत्तरं तर द्यावीच लागतील.”
 
धीरेंद्रनाथ सिंहही आपल्या 80 वर्षांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी स्मशानघाटावर पोचले आहेत.
 
ते म्हणतात, “गेल्या महिन्यात त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं, पण ते घरी परत आले होते.”
 
वडिलांचा मृत्यू ‘उष्माघात’ आणि ‘उन्हामुळे’ झाला असं ते म्हणतात.
 
धीरेंद्रनाथ गेल्या तीन दिवसांपासून कोणाच्या ना कोणाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात येत आहेत आणि आता तर ते स्वतःच्या वडिलांना मुखाग्नी द्यायला आलेत.
 
त्यांना वाटतं की उष्णतेच्या लाटेने अनेकांचा मृत्यू होतोय.
 
ते म्हणतात, “सरकार आकडा एक सांगतंय, पण प्रत्यक्षात गावांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा दुसराच आहे.”
 
अशा प्रकारच्या घटनांमध्ये सरकारची काय जबाबदारी आहे असं विचारल्यावर धीरेंद्रनाथ म्हणतात, “नैसर्गिक कारण आहे. यात सरकार काय करणार? प्रशासन काय करणार? उष्ण वारे वाहातील, उष्णतेची लाट असेल त्यात सरकारची काय चूक. जेव्हा हवामान बदलेल, तेव्हा सगळं ठीक होईल.”
 
स्मशानघाटावर काम करणारे अमित म्हणतात, “आज इथे फक्त 8-10 मृतदेह आले आहेत. असं ऐकलंय की काही दिवसांपूर्वी 60-70 येत होत्या. कधी एका दिवसात 35 मृतदेह आले. गेल्या 10 दिवसांपासून हेच होत होतं. 20 तारखेपासून इथली परिस्थिती नॉर्मल आहे.”
 
68 मृतांचा आकडा समोर आल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोणतेही नवे आकडे जारी केलेले नाहीत.
 
बीबीसीने प्रशासन काय करतंय हे जाणून घेण्यासाठी बलियाच्या जिल्हा रूग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिक्षक एस के यादव यांच्याशी बातचीत केली.
 
यादव म्हणाले, “आमच्याकडे रोज 8-10 लोक गंभीर आजारांमुळे येतात. उष्णतेच्या लाटेचा प्रश्न नाहीये हा. बलिया खूप मोठा भाग आहे. 140 किलोमीटर एका बाजूला आणि 100 किलोमीटर दुसऱ्या बाजूला. मध्ये हे एकच रूग्णालय आहे. आसपास कोणतंही मोठं हॉस्पिटल नसल्यामुळे लोक इथेच येतात. रोज इथे 100-150 लोक दाखल होतात, त्यातले अनेक गंभीर आजारांनी त्रस्त असतात.”
 
रूग्णालयात असलेल्या व्यवस्थेबद्दल बोलताना एस के यादव म्हणाले, “हॉस्पिटल थंड ठेवण्यासाठी इथे एसी आणि कूलर लावले गेलेत. आता हॉस्पिटलमध्ये पुरेशी औषधं, कर्मचारी आणि फर्निचर आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वृद्ध दाम्पात्याची आत्महत्या