Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भाच्या भागांत उष्णतेची लाट

महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भाच्या भागांत उष्णतेची लाट
, शनिवार, 13 मे 2023 (21:05 IST)
पुणे :उन्हाच्या काहिलीने महाराष्ट्राची लाही लाही झाली असून, जळगावात शुक्रवारी देशभरातील सर्वाधिक 44.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून, विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भाच्या भागांत उष्णतेची लाट पसरली आहे. त्यातही सौराष्ट्र व कच्छच्या भागात ऑरेंज, तर इतरत्र यलो अलर्ट आहे. सकाळी आठपासूनच उन्हाचा कडाका वाढला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान चाळीशीच्या पार गेले असून, उष्णतेने काहिली होत आहे. कोकणात उष्म्यामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. काहिलीमुळे थंड पेयांना मागणी वाढली आहे. तसेच दुपारच्या सुमारास वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
 
वादळाचा परिणाम
बंगालच्या वादळात ‘मोचा’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे बाष्प या यंत्रणेकडे खेचले जात आहे. यामुळे इतरत्र कोरडे हवामान असून, उन्हाचा कडाका वाढला आहे.
 
विदर्भात उष्णतेची लाट
कोकण, मध्य महाराष्ट्रात गेले दोन दिवस उष्णतेची लाट होती. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्म्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
 
आजारांत वाढ
 
उन्हाळय़ामुळे आजारांत वाढ झाली आहे. अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, ताप या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
 
जळगाव तापले
गेले दोन दिवस जळगावात देशातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात 44.9 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले.
 
महाराष्ट्रातील अनेक शहरे चाळीशी पार
शुक्रवारी राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये :
पुणे 40.8, कोल्हापूर 35.6, महाबळेश्वर 33.6, नाशिक 39.7, सांगली 38.1, सातारा 40.1, सोलापूर 41.4, मुंबई 34.4, सांताक्रूझ 35.2, अलिबाग 37, रत्नागिरी 35, पणजी 35.4, उस्मानाबाद 41.1, औरंगाबाद 41.4, परभणी 43.6, नांदेड 42.8, बीड 42.6, अकोला 44.5, अमरावती 42.6, बुलढाणा 40.6, ब्रह्मपुरी 41.2, गोंदिया 42.5, वर्धा 43.4, यवतमाळ 42.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातारा : ‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे