सांगली : जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
घराला चारी बाजूंनी 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न झाल्याची भयानक घडली. वांगीमधील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घरासमोर व मागील दरवाज्यास विद्युत वाहक तारे 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. 11 केव्ही विजेवर करंट दिल्याने विद्युत वितरण कंपनीची वांगी आणि तडसर गावची वीज बंद पडल्याने सुदैवाने निकम यांचे संपूर्ण कुटुंब वाचले.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक निकम हे वांगी गावात कुटुंबासह राहतात. रात्री निकम आपली पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक घरासमोर विजेचा मोठा जाळ झाला व घरातील लाईट गेली. मात्र, ट्रान्सफार्ममध्ये जाळ झाला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर घरालगत जाळ झाल्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना जागे केले.
बॅटरीच्या सहाय्याने घराबाहेर डोकावल्यावर त्यांना विज वाहक तार घराच्या दरवाजाजवळ अडकवलेली दिसून आली. 11 केव्ही या तारेतून घराच्या दोन्ही दरवाजास विद्युत वाहक तारेने कंरट दिल्याचे दिसून आले. अज्ञात लोकांनी कंरट दिलेली वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्या वायरला एक हजार फूट लाब हिरव्या रंगाची नायलॉन रशी बांधून ती उसातून जोडून ठेवली होती. घरातील लोक बाहेर आल्यावर अज्ञात ती रस्सी ओढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते त्यात अयशस्वी झाले अन् घटनास्थळापासून पलायन केले. या प्रकरणातून निकम कुटुंब थोडक्यात बचावले.