राजधानी दिल्लीच्या स्वरूप नगर भागात शुक्रवारी सकाळी एका पाळीव पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. कुत्र्याच्या हल्ल्यादरम्यान कुत्र्याच्या मालकाच्या कुटुंबीयांनी महिलेलाही मारहाण केली.
कुत्र्याने तिला चार ठिकाणी चावा घेतल्याचे महिलेचे म्हणणे आहे. कुत्र्याच्या मालकाने भडकावल्याने कुत्र्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. घरासमोर कुत्र्याने शौच केल्याने झालेल्या वादातून ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्वरूप नगर पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ही घटना स्वरूप नगरमधील गल्ली क्रमांक 14 मध्ये घडली. पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केलेल्या महिलेचा पती राजेश कुमार प्रसाद यांनी सांगितले की, शेजारी राहणारे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुत्र्याला घरासमोर शौच करायला लावत आहे. शुक्रवारी सकाळी त्यांची पत्नी रिया देवी यांनी घर समोर कुत्र्याला शौच करू देऊ नका अशी तक्रार करण्यासाठी शेजारी गेली असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली.
यावेळी शेजारच्या मुलाने माझ्या पत्नीला ढकलले, त्यानंतर ती खाली पडली. दरम्यान, शेजारच्या मुलाने आपल्या पाळीव कुत्र्यालाही तिच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले. कुत्र्याने पत्नीच्या उजव्या पायाला व हाताला असे चार ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. याची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जबाब नोंदवला.
फिर्यादी राजेश कुमार हे जखमी पत्नीला उपचारासाठी जहांगीरपुरीच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेले. जिथे उपचार आणि एमएलसीनंतर त्यांनी स्वरूप नगर पोलीस ठाणे गाठून या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार केली.
पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, रस्त्यावर राहणारे लोक पिटबुल जातीच्या कुत्र्याला खूप घाबरतात. या भीतीमुळे लोकांनी आपल्या मुलांना रस्त्यावर खेळायला पाठवणे बंद केले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका महिलेवर कुत्र्याने हल्ला केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.