गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एआर पटेल यांच्या न्यायालयाने 49 आरोपींपैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 70 मिनिटांत 56 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक जखमी झाले. 13 वर्षांहून अधिक काळ न्यायालयात खटला चालल्यानंतर गेल्या आठवड्यात 49 जणांना दोषी ठरवण्यात आले आणि 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सोमवारी फिर्यादी पक्षाने युक्तिवाद पूर्ण करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 77 आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती. खटला सुरू असलेल्या 78 आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. 2002 च्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.