कॉंग्रेसमध्ये अजूनही धुसपूस सुरूच आहे. कारण आता काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी एका पत्राचा बॉम्ब फोडण्यात आला आहे. पण यावेळी हे पत्र महाराष्ट्रातून नसून ते उत्तर प्रदेशातून पाठवण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या 9 वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष चालवावा, असा सल्ला त्यांनी पत्रातून दिला असल्याची माहिती देण्यात येत आहे. कॉंग्रेसला आता घराणेशाहीच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल असंह त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
या पत्रावर माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भुधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांनी स्वाक्षरी केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था सगळ्यात वाईट आहे असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
या पत्रामध्ये काँग्रेसमध्ये ढिसाळ कारभार सुरू असल्याचं नेत्यांनी स्पष्टपणे लिहलं आहे. राज्यामध्ये कसा कारभार सुरू आहे याची माहिती तुम्हाला प्रभारींकडून मिळत नाही असं दिसतंय. आम्ही आपल्याला भेटण्यासाठी गेल्या एका वर्षापासून मागणी करत आहोत. पण आम्हाला नकार दिला गेला. काही मंडळी ही वेतन तत्त्वावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत अशा लोकांकडे पदं आहेत, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.
या नेत्यांना पक्षाची विचारधारा माहित नाही. पण, त्यांना उत्तर प्रदेशात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा पक्ष चालवावा. अन्यथा काँग्रेसचा इतिहास जमा होईल असं या पत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही यावेळी लक्ष्य करण्यात आलं आहे. चार पानांच्या पत्रामध्ये सोनिया गांधी यांनी घराणेशाही पलिकडे जावून काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता काँग्रेसमध्ये आणखी काय वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.