मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. सोबतच बृजभूषण यांनी केलेल्या विरोधाचे कारण आपणाला माहित नसून त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकमध्ये खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते.
यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याविषयी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. सध्या राज्यात अनाचार सुरू असून मनमानी पद्धतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आम्ही लढतच आहोत राज ठाकरे यांनी देखील लढले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी राज्यातील प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले तर अधिक चांगले होईल. शेतकरी, महिला आदिवासी आणि बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांच्या सरकाला निर्देश दिले पाहिजे. राज्यातील कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे तो पाहता महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.