Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरातच्या निवडणुका यंदा भाजपसाठी अवघड आहेत का?

kamal 600
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (09:46 IST)
आता गुजरातच्या निवडणुकांच बिगुल वाजलंय. येत्या काही दिवसांत निवडणुकांच्या तारखा घोषित होतील.
पण मागच्या महिनाभरापासूनच गुजरात निवडणुकीचं रणांगण तापलंय. भाजप असो काँग्रेस असो किंवा मग आम आदमी पक्ष सगळे झाडून प्रचार करतायत.
 
2017 मध्ये गुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने होती. काँग्रेसने भाजपला कडवी झुंज देऊन 99 जागांवर समाधान मानायला लावलं होतं.
 
पण आता या दोघांमध्ये तिसऱ्याने म्हणजे आम आदमी पक्षाने एन्ट्री मारली आहे. त्यामुळे भाजप असो की काँग्रेस सगळ्यांसाठीच ही निवडणूक अटीतटीची झाली. पण भाजपसाठी हा डाव मोठा आहे.
 
2012 मध्ये भाजपने गुजरातमध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. 2017 मध्ये काँग्रेसमुळे या जागा कमी होऊन आकडा 99 वर येऊन पोहोचला.
 
पण काँग्रेसचे बरेच आमदार आता भाजपवासी झालेत ही वेगळी गोष्ट आहे. 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतरची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.
 
2017 च्या निवडणुकीत बऱ्याच जागा गमावल्यात याचं शल्य भाजपच्या मनात आजही आहे. त्यामुळे यावेळी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने गुजरातमध्ये मोठा जोर लावल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिनाभरात तीनवेळा गुजरातचा दौरा केलाय.
 
याशिवाय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुजरात हे मोदी आणि शहा यांचं गृहराज्य आहे.
 
आम आदमी पक्षाच्या एंट्रीमुळे स्पर्धा जरा अवघड
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये तळ ठोकलाय. त्यांनी गुजरातमध्ये आपली संपूर्ण ताकद लावलीय. त्यांनी गुजरात मध्ये भाजपला थेट आव्हान दिलंय.
 
राहुल गांधी सध्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी गुजरातचे फारसे दौरे केलेले नाहीत. मात्र त्यांचा पक्षही नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करताना दिसतोय.
हे सगळं बघता भाजप पूर्वीपेक्षा जास्त सतर्क झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या 'सायलंट कॅम्पेनिंग' बद्दल भाजप कार्यकर्त्यांना इशारा दिलाय.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, "याआधीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा खूप गोंधळ असायचा. सोबतच भाजपला हटवण्यासाठी शेखी मिरवायचे. पण 20 वर्ष झाले आम्ही हरलो नाही. त्यामुळे त्यांनी आता नवे प्रयोग करायला सुरुवात केलीय. आणि आपल्याला सावध राहण्याची गरज आहे."
 
विश्लेषकांना वाटतं की, यावेळी भाजपसमोर काँग्रेससोबत आम आदमी पक्षाचं सुद्धा आव्हान असणार आहे. भाजप आणि आम आदमी पक्ष हिंदुत्वाचं राजकारण करत असल्याची जाणीव काँग्रेसने करून द्यायला सुरुवात केली आहे.
 
तेच दुसरीकडे दिल्ली मॉडेल समोर उभं करून गुजरात जिंकण्याचे मनसुबे आम आदमी पार्टीने आखले आहेत.
आम आदमी पार्टीने या निवडणुकीत सरकारी कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यापासून ते मोहल्ला क्लिनिक, मोफत शाळा, जास्तीत जास्त सरकारी शाळा सुरू करण्याची वचनं दिली आहेत.
 
आम आदमी पक्षानेही भाजपप्रमाणे लोकांच्या हिंदू अस्मितेला साद घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
 
भाजप नर्व्हस आहे का?
वरिष्ठ राजकीय विश्लेषक घनश्याम शाह बीबीसीशी बोलताना सांगतात की, "भाजप काँग्रेसपेक्षाही मोठं चॅलेंज म्हणून आम आदमी पक्षाकडे बघताना दिसून येत आहे. कारण आम आदमी पक्ष त्यांचीच भाषा म्हणजेच हिंदुत्वाची भाषा बोलतोय."
शाह म्हणतात, "आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रमुख गोपाल इटालिया यांनी भाजपविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. ते राज्यातील महत्वाच्या अशा पाटीदार समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे अपिलिंग वाटतात."
 
शाह यांच्या म्हणण्यानुसार, "पक्षाने गुजरातच्या लोअर मिडल क्लास लोकांवर फोकस केलाय. सध्या या वर्गासमोर अनेक प्रकारची आर्थिक संकट, नोकऱ्या, शिक्षण अशा समस्या उभ्या आहेत. आणि आम आदमी पक्षाने जी आश्वासनं दिली आहेत ते पाहता हे लोक पक्षाकडे आकर्षित होताना दिसतात. त्यामुळे आम आदमी पक्ष हा सर्वात मोठं आव्हान म्हणून समोर येताना दिसतोय."
 
भाजपची आक्रमक वृत्ती
अजून असे बरेचसे विश्लेषक आहेत ज्यांना काँग्रेसपेक्षा आम आदमी पक्षाचं मोठं आव्हान दिसून आलं आहे. त्यातल्या काही जणांचं म्हणणं आहे की, भाजप यावेळी नर्व्हस दिसून येतोय. त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या विरोधात आक्रमक मोर्चा उघडलाय.
 
अलीकडेच राज्य सरकारने आम आदमी पक्षाचे नेते इसुदान गढवी यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई सरकारने अस्वस्थतेतून केल्याची चर्चा आहे.
 
मात्र वरिष्ठ पत्रकार आणि 'वाइब्स ऑफ इंडिया'च्या संपादक दीपल त्रिवेदी यांना असं वाटत नाही. बीबीसीशी बोलताना त्या सांगतात की, "भाजप नर्व्हस नाहीये. ते तसं दाखवत जरी असले तरी तसं नाहीये. 2007 पासूनच्या महानगरपालिका निवडणुका असो पंचायत असो विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका असो, भाजपने नेहमीच आक्रमक पद्धतीने निवडणूका लढवल्याचं मी पाहिलंय."
 
त्या पुढे सांगतात, "भाजप खूप फोकसने इलेक्शन लढते. त्यांचं मायक्रो मॅनेजमेंटवर पूर्ण लक्ष असतं. सुरुवातीला हे काम मोदीजी करायचे आता हे काम अमित शाह करतात. त्यामुळे भाजप घाबरलेलं नसून त्यांनी अजून बारकाईने काम करायला सुरुवात केल्याचं दिसतं. आणि यंदाच्या निवडणुकीत आपल्याला हेच दिसतं."
 
त्रिवेदी या मागचं कारणही सांगतात, "भलेही काँग्रेसचा शहरी भागात तितकासा प्रभाव नाहीये, मात्र ग्रामीण भागावर आजही त्यांची पकड मजबूत असल्याचं मला काही दौऱ्यांमध्ये आढळून आलं. त्यामुळे काँग्रेसला सहजासहजी बाद करता येणार नाही. या भागांमध्ये भाजपसोमर काँग्रेसचं आव्हान आहे. मात्र आम आदमीच्या एंट्रीने ही निवडणूक आणखीनच रंजक बनलीय."
 
गुजरात जिंकणं मोदींसाठी खूप महत्त्वाचं
दीपल त्रिवेदी सांगतात की, "लोकांना आधी वाटायचं आम आदमी पक्ष भाजपची बी टीम आहे. मात्र गुजरातमध्ये इशुदान गढवी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी गांभीर्याने मैदानात एंट्री केली आहे. आता ते रस्त्यावर उतरून भाजप विरोधात लढताना दिसतायत."
 
त्रिवेदी पुढे सांगतात, "2024 च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणून गुजरातच्या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे गुजरात निवडणुका मोदी आणि भाजपसाठी खूप महत्त्वाच्या आहेत."
लोकसभेच्या निवडणुकीत गुजरात हे भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधून 26 जागा जिंकल्या होत्या. पण 2024 मध्ये एवढ्या जागा निघणंही कठीण असल्याचं दीपल त्रिवेदी सांगतात.
 
त्या सांगतात, "1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 121 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मोदीजी सत्तेत आले तरी त्यांना ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत या मॅजिक फिगर पर्यंत पोहोचण्याचा मोदींचा प्रयत्न राहील. त्यांच्या पंतप्रधान या इमेजसाठी सुद्धा हा आकडा महत्वाचा आहे. त्यामुळेच भाजप गुजरातमध्ये जोर लावताना दिसून येतंय."
 
भाजप प्रत्येक निवडणूक प्राणपणाने लढवते
या गुजरात निवडणुकीच्या रिंगणात प्रचार करण्यासाठी बडे बडे नेते उतरणार आहेत. यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दिसणार आहेत.
 
यावर वरिष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी सांगतात की, ही भाजपची रणनीती आहे. भाजपने आजवरच्या प्रत्येक निवडणूका प्राणपणाने लढवल्या आहेत. मग ती निवडणूक नगरपालिकेची असो वा लोकसभेची.
 
ते सांगतात, "हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने खूपच जोर लावला होता. आणि त्यांच्या या रणनीतीवर जोरदार टीकाही झाली होती. पण काही असो, भाजपने खूप मन लावून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजप गुजरातमध्ये एवढा जोर लावताना दिसते हा प्रश्नच मुळात निरर्थक आहे."
 
"गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका सेमी फायनल्स असल्याप्रमाणे आहेत. यानंतर फायनल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे या निवडणुका जिंकून आजही आमचंच पारडं जड आहे हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल."
 
विजय त्रिवेदी पुढे सांगतात की, "गुजरात इलेक्शन्स भाजपसाठी खूप महत्वाचे आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा पराभव करण्यासोबतच त्यांना हे देखील दाखवून द्यावं लागेल की, मोदींच्या रणनीतीला आव्हान देणं त्यांना अजूनतरी शक्य नाहीये. आणि 2024 च्या लोकसभेसाठी हा संदेश खूप महत्वाचा आहे."
 
गुजरात विधानसभेची सद्यस्थिती काय?
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 77 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये भाजपचा वोट शेअर 49.05 टक्के इतका होता.
 
गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी 40 जागा राखीव आहेत. यात अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 27 जागा आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 13 जागा आहेत.
 
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर काँग्रेसचे अनेक नेते भाजपवासी झाले. त्यामुळे आता गुजरात विधानसभेत भाजपचे एकूण 111 सदस्य आहेत. तर काँग्रेसचे एकूण 62 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय आदिवासी पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आणि एक अपक्ष सदस्य आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

T20 WC 2022: गौतम गंभीरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला..