काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांच्याविरोधात आरोप केले आहेत. पक्षाचा अध्यक्ष माझ्याविरोधात कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप भाई जगताप यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच सिद्दिकी यांनी काही घटनांबाबतही सांगितले आहे.
काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी पत्रात म्हटलं आहे की, मुंबई काँग्रेस मार्फत टूलकिट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. वांद्रे येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, काँग्रेस मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित केले होते. परंतु वाद्रेचे स्थानिक आमदार असून झिशान सिद्दिकी यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. स्थानिक आमदार असून आमंत्रित न केल्यामुळे झिशान सिद्दिकी यांनी नाराजी व्यक्त करत स्थानिक आमदाराला बोलवलं नाही हा प्रोटोकॉल तोडण्यासारखे आहे असे झिशान सिद्दिकी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईतील निवडणूकीत झिशान सिद्दिकीला मदत केली तर पक्षात पद देणार नाही असे पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांना बाजवले होते. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना बजावले जात आहे आणि माझ्याविरोधात काम करणाऱ्यांना ताकद दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केला आहे.