उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला आहे. तसेच अमेठीत राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर जिल्हा अध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही आपला राजीनामा पाठवून दिला. दरम्यान, लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीनंतर ओडिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही राजीनामा दिला.
उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. फतेहपूर सीकरी येथून काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. पक्षाने अगोदर राज बब्बर यांना मुरादाबाद येथून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी येथून निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना मुरादाबाद येथून निवडणूक रिंगणात उतरविले.