Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ फारूख अब्दुल्ला यांचे म्हणणे भारताचे गृहमंत्री खोटारडे

डॉ फारूख अब्दुल्ला यांचे म्हणणे भारताचे गृहमंत्री खोटारडे
श्रीनगर , गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (08:23 IST)
सरकारने स्थानबद्ध केले असल्याचा केला दावा

जम्मू काश्‍मीरातील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांना सरकारने स्थानबद्ध किंवा अटक केलेली नाही असे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत केले होते. त्याला डॉ अब्दुल्ला यांनी जोरदार आक्षेप घेताना म्हटले आहे की सरकारने मला सोमवारपासून स्थानबद्ध करून ठेवले असून गृहमंत्र्यांनी आपल्याबाबत खोटारडेपणा केला आहे. गृहमंत्री अशा प्रकारे खोटे बोलत असल्याचे पाहून मला दु:ख झाले आहे. फारूख अब्दुल्ला हे स्वताहूनच आपल्या घरात थांबले आहेत असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. पण ही सर्व माहिती खोटेपणाची आहे, असे डॉ अब्दुल्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की माझ्या घराला त्यांनी बाहेरून कुलप लावले असून मला घराबाहेर पडता येणार नाही असाच बंदोबस्त सरकारने केला होता. गृहमंत्र्यांनी आपल्याला स्थानबद्ध करण्यात आलेले नाही असे संसदेत निवेदन केल्यानंतर मी सुरक्षा आधिकाऱ्यांवर जोरजबरदस्ती करून घराबाहेर पडलो असे ते म्हणाले. मला स्थानबद्ध करण्यात आलेले नाही असे जर गृहमंत्रीच म्हणत असतील तर तुम्ही मला आडवणारे कोण असे मी सुरक्षा अधिकाऱ्यांना खडसाऊन विचारल्यानंतर मला बाहेर पडता आले असे ते म्हणाले. जम्मू काश्‍मीर राज्याचे विभाजन आणि या राज्याचा विशेष दर्जा काढून घेणे हा विश्‍वासघात असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले की आम्ही खुनी नाही, आम्ही कधीही सैनिकांवर दगडफेक केलेली नाही. आम्ही महात्मा गांधी यांच्याच विचारधारेचा मार्ग अनुसरला आहे असे असताना आम्हाला अडकवून ठेवण्याचे कारण काय आमचा गुन्हा काय हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. 370 कलमाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असताना सरकारने त्यावर इतक्‍या तातडीने निर्णय घेण्याची काय गरज होती असा सवालही त्यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा सोने, चांदीचे भाव वाढले