सोशल मीडियातील फेसबुक हे प्रभावी माध्यम आहे. फेसबुकच्या माध्यमातून लाखो लोकांकडे पोहोचता येते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खोट्या बातम्यामुळे दंगल होऊन काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवण्यात तरुणांपेक्षा 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींची संख्या अधिक आहे, अशी धक्कादायक माहिती एका सर्व्हेतून समोर आली आहे.
न्यूयॉर्क विद्यापीठ आणि प्रिंसटन विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेत 2016 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या काळात फेसबुकवर खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात होत्या. त्यावेळी केलेल्या या सर्व्हेतून ही माहिती उघड झाली आहे. 65 वर्षे व त्यापेक्षा अधिक असलेले वयोवृद्ध लोक खोट्या बातम्या फेसबुकवर शेअर करण्यात पटाईत असल्याचे उघडकीस आले आहे. 65 वर्षांवरील अधिक वृद्धांनी 18 ते 29 या वयोगटातील तरुणांच्या तुलनेत पाचपट अधिक खोट्या बातम्या फेसबुकवर पसरवल्या आहेत, असे या अभ्यासातून समोर आले आहे. फेसबुकवर वृद्ध लोकांनी खोट्या बातम्या पसरवल्या असल्या तरी या बातम्यांना अपेक्षित असे यश मिळालेले नाही, असेही या सर्व्हेत म्हटले आहे. 18 ते 29 या वयोगटातील तरुणांनी केवळ 3 टक्के खोट्या बातम्या फेसबुकवर शेअर केल्या होत्या. वृद्ध व्यक्तीकडून पसरवण्यात येत असलेल्या खोट्या बातम्या ओळखण्यासाठी आपल्याला नवीन उपाय शोधावा लागेल, असे प्रिंसटन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक अँड्र्य्यू गेस यांनी सांगितले.