वाराणसी- प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जाताना काय परिधान करत आहात यावर लक्ष द्या नाहीतर दर्शनलाभापासून वंचित राहू शकता. येथे मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी परिधान करावे लागणार आहे. या ड्रेसकोडमध्येच काशी विश्वनाथाचं दर्शन घेता येईल.
या नव्या ड्रेसकोडनुसार, पारंपरिक वस्त्रे परिधान करून गेल्यावरच भाविकांना देवाला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. हा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतलेला असून आता जीन्स, पॅट, टी-शर्ट, शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येईल परंतू देवाला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी मिळणार नाही.
या निर्णयासह गाभाऱ्यात जाऊन देवाच्या स्पर्श दर्शनाची वेळही वाढवण्यात आली आहे. मंदिरात स्पर्श दर्शनासाठी रोज एका तासाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मकर संक्रांतीनंतर या वेळेत वाढ करून ती सात तास करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीनंतर ही नवी व्यवस्था लागू होणार आहे. मंगला आरतीपासून दुपारच्या आरतीपर्यंत दररोज देवाचं गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन घेता येणार आहेत.
स्पर्श दर्शनासाठी पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी नेसावी लागणार आहे.