जयपूरमध्ये मोठा अपघात टळला आहे. जयपूरहून 30 प्रवाशांना निवाईला जाणाऱ्या रोडवेजच्या बसने चैनपुरा क्रॉसिंगवर अचानक पेट घेतला. या मुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
आगीची माहिती मिळतातच पोलीस अधिकारी आणि पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि अग्निशमनदलाला माहिती दिली. अग्निशमनदलाचे बंब येण्यापूर्वीच क्रॉसिंगवरील पाण्याची टाकी आणि ट्यूबवेलचा वापर करून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आग विझवून आटोक्यात आणले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जयपूरहून टोंकच्या निवाई मार्गे कोट्याला जाणाऱ्या रोडवेजच्या बस मध्ये चैनपुरा क्रॉसिंगवर वायरिंगमध्ये शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागली.
बसमधील प्रवासी घाबरून ओरडू लागले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बसमधील प्रवाशी आणि बसच्या चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली. बसला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस घटनेचा तपास करत आहे.